Join us

इर्शाळवाडी दुर्घटनेची भयावह कहाणी; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात मांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:43 PM

इर्शाळवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकांसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहे अशी माहिती अजित पवारांनी सभागृहाला दिली.

मुंबई - रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी इथं (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत मात्र खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत आहेत. सरकार प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर सरकारच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली.  

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, रायगड जिल्ह्यातल्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना 19 जुलै 2023 रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत गावातली घरे मातीच्या ढिगाऱ्या खाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं आणि दुर्घटना घडलेले ठिकाण दुर्गम भागात असल्यानं त्याठिकाणी संपर्क साधताना सुध्दा अनेक अडथळे येत होते. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबी सारख्या मशनरी घटनास्थळी पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टरची आवश्यकता आहे. राज्य सरकारने दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवली आहेत. मात्र खराब हवामानामुळे हॅलिकॉप्टरला उड्डाण करणे शक्य होत नाही, त्यामुळे हवाई आणि यांत्रिक मदतीला सुध्दा मर्यादा येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाकडूनचं मदत व बचाव कार्य करावे लागत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच ‘एनडीआरएफ’ पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीला यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, चौक आणि वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह पाचशेहून अधिक मजूरांचा सहभाग आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याला तसेच नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे प्राधान्य आहे. इर्शाळवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकांसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहे अशी माहिती अजित पवारांनी सभागृहाला दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार महेश बांदे उपस्थित आहेत. तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. सकाळपासूनच मंत्रालयातल्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातून मी स्वत: सर्व बाबींवर लक्ष ठेऊन आहे. इर्शाळवाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब आहेत, तेथील लोकसंख्या २२८ असली तरी अनेक लोक नोकरीच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गावी असतात त्यामुळे दुर्घटनेच्यावेळी नक्की किती लोक गावात होते हे समजू शकत नाही. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते. तसेच या ठिकाणी यापुर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नव्हत्या. खालापूर तालुक्यात १७ आणि १९ जुलै २०२३ या तीन दिवसात एकुण ४९९ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. दुर्घटना घडलेले ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात असून, सद्यःस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे असंही अजित पवारांनी सभागृहाला सांगितले.

टॅग्स :रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणअजित पवारविधान परिषद