बाळाला वाचवताना गंभीर दुखापत, १४ वर्षांच्या साक्षीला मिळणार नवा पाय; केईएमनं घेतली संपूर्ण जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 05:05 PM2021-08-02T17:05:56+5:302021-08-02T17:07:28+5:30
पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेलं एका छोट्याश्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्याच्या बाळाला वाचविताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळून एक पाय निकामी झाला.
पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेलं एका छोट्याश्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्याच्या बाळाला वाचविताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळून एक पाय निकामी झाला.
साक्षीने जीव धोक्यात घालून त्या बाळाला वाचविण्याचे जे धाडस दाखविले त्या धाडसाबद्दल मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन तिची आज भेट घेतली व विचारपूस केली. त्यासोबतच मदतीचा हात म्हणून महापौर किशोरी पेडणेकर व आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती राजूल पटेल यांनी साक्षीला एक लाख रुपयांचा रोख निधी आर्थिक मदत म्हणून तिच्याकडे सुपूर्द केला. तसेच नगरसेवक अनिल कोकिळ यांनी २५ हजारांचा धनादेश दिला. याप्रसंगी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.हेमंत देशमुख व संबंधित डॉक्टर उपस्थित होते.
"ज्याप्रमाणे हिमतीने तू बाळाला वाचविले आहे. तीच हिम्मत तू आताही कायम ठेव. तुझ्यावर केईएम रुग्णालय संपूर्णपणे मोफत उपचार करणार असून प्रारंभी जयपुर फुट व त्यानंतर बारा लाख रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे सारबो रबर पाय मोफत बसविणार आहे. तू पूर्वीप्रमाणेच धावण्याच्या शर्यतीत सहभाही होऊ शकणार आहेस", असं महापौर साक्षीला धीर देत म्हणाल्या.
साक्षीच्या संपूर्ण उपचाराचा खर्च केईएम रुग्णालय मोफत करणार असून तिला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी डॉक्टर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत. ती पूर्वीसारखीच चालेल, धावेल असा विश्वास आहे, असं महापौरांनी सांगितलं. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. साक्षीने माणुसकीचे दर्शन घडविले असून गावागावात आजही चांगले संस्कार होत असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत असल्याचे महापौरांनी सांगितले.
साक्षी सोबत नेमकं काय घडलं होतं?
साक्षी दाभेकर १४ वर्षांची असून महाडच्या पोलादपुर तालुक्यातल्या केवनाळे गावचा अभिमान असणारी साक्षी पुढे जाऊन क्रीडाविश्वात चांगलं नाव कमवेल हीच सर्वांची आशा होती. पावसाचं थैमान आणि मिट्ट काळोखात एका लहान बाळावर आलेलं संकट साक्षीनं स्वत:वर झेललं खरं, पण याची पुढं आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी सुतरामही कल्पना तिला नव्हती. संध्याकाळी गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर एक दरड कोसळली. शेजारच्या घरातल्या नवजात बालकाचा टाहो ऐकला आणि साक्षीनं एका उडीतच तिने शेजारच्या उफाळे कुटुंबियाच्या बाळाचा जीव वाचविला. पण यात तिला आपला एक पाय गमावावा लागला. घराची भींत साक्षीच्या पायावर कोसळली.