Join us

सॅल्युट! इर्शाळवाडी दुर्घटनेत नितीन देसाई तत्काळ आले धावून; २५ मिनिटांत पोहोचवली पहिली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 3:26 PM

Nitin Desai Helped First in Raigad Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडी दुर्घटनेवेळी सगळ्यांत आधी नितीन देसाई यांनी महत्त्वाची मदत केली होती.

Nitin Desai Helped First in Raigad Irshalwadi Landslide Incident: काही दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून ५७ जण मृत्युमुखी पडले. तर अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. इर्शाळवाडी दुर्गम भागात असल्यामुळे यांत्रिक मदत पोहोचू शकत नव्हती. एनडीआरफसह अनेकांनी यात मोलाची मदत केली. मात्र, नितीन चंद्रकांत देसाई यांनी सर्वप्रथम मदत पोहोचवली. मध्यरात्री नितीन देसाई यांना फोन केला. त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत नितीन देसाईंनी सोय उपलब्ध करून दिली, अशी महिती मिळाली आहे. 

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्यांच्या निधनाबाबत कलाक्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला जात असून, एनडी स्टुडिओवरील कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एनडी स्टुडिओ येथे जाऊन अभिनेते, कलाकार, नेतेमंडळी, कलासृष्टीतील अनेकांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते. इर्शाळवाडी दुर्घटनेवेळी नितीन देसाईंनी अगदी क्षणाचाही विलंब न लावता मदत केली, अशी माहिती त्यांनी दिली.

नितीन देसाई ही सर्वप्रथम धावून येणारी व्यक्ती

इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडली, तेव्हा लगेच आम्ही तिथे पोहोचलो होतो. मुसळधार पावसात आम्ही गड चढत होतो. तेव्हा वरून अशी माहिती आली की, तिथे खूप पाऊस आणि थांबायलाही जागा नाही. तेव्हा अगदी तत्काळ मदत ही टेन्ट्स किंवा निवारा हवा होता. त्या परिस्थितीत सर्वप्रथम नितीन देसाईंचे नाव समोर आले. कारण, नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओ जवळ होता. रात्रीचे दीड ते दोन वाजले होते. त्यावेळी त्यांना फोन केला. इर्शाळवाडीच्या दुर्दैवी घटनेबाबत माहिती दिली आणि आम्हाला टेन्ट्स हवेत, असे सांगितले. अगदी क्षणाचाही विलंब न करता नितीन देसाई म्हणाले की, गडाखालून टेन्ट्स न्याययी व्यवस्था करा. काही वेळात टेन्ट्स पोहोचतील. अगदी तसेच झाले. अवघ्या २५ ते ३० मिनिटांत टेन्ट्स गडाखाली आले होते, अशी आठवण सोमनाथ घार्गे यांनी सांगितली.

दरम्यान, मध्यरात्री त्यांना फोन करून उठवले आणि तत्परतेने, क्षणाचाही विलंब न करता लगेच मदत उपलब्ध करून दिली. निश्चितच ते कलाक्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व होते, असे सांगत आदरांजली वाहिली.

 

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण