मुंबई - ऐन गर्दीच्यावेळी मध्यरेल्वे मार्गावर होणा-या बिघाडामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. शनिवारी सकाळी सायना-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे. कुर्ल्याच्यापुढे जलदमार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. जलद मार्गावरील गाडया 15 ते 20 मिनिटे एकाच ठिकाणी थांबून होत्या. सीएसटीकडे येणा-या जलद लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत. दोन दिवसांपूर्वीच सकाळी गर्दीच्यावेळी डोंबिवली-विठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना वारंवार असे अनुभव येत असतात. महत्वाचं म्हणजे ऐन गर्दीच्याचवेळी असे हाल होतात. कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी पेंटोग्राफ तुटला, कधी इंजिन बंद पडले तर कधी रेल्वे रुळाला तडे गेले यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते.