डबल इंजिन लावल्याप्रमाणे रेल्वेच्या विकासकामांचा वेग!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:49 AM2019-03-04T05:49:21+5:302019-03-04T05:49:32+5:30
गेल्या ६० ते ६५ वर्षांत उपनगरी रेल्वे प्रवाशांवर अन्याय झाला आहे. मात्र, सर्वसामान्य मुंबईकरांना आरामदायी प्रवास देण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने विविध विकासकामे हाती घेतली आहेत.
मुंबई : गेल्या ६० ते ६५ वर्षांत उपनगरी रेल्वे प्रवाशांवर अन्याय झाला आहे. मात्र, सर्वसामान्य मुंबईकरांना आरामदायी प्रवास देण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने ही विकासकामे डबल इंजीन लावल्याप्रमाणे पूर्ण होत आहेत, असे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले.
उपनगरी रेल्वे मार्गावरील
अनेक पायाभूत सुविधांचे आणि प्रकल्पांचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात गोयल बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मी मुंबईतच वाढलो असल्याने मुंबईकरांच्या समस्या मला ज्ञात आहेत. त्या दूर करणे माझे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने केलेला एक प्रयत्न म्हणजेच ‘परळ उपनगरी टर्मिनस’. तब्बल २० ते २२ वर्षांनी माझ्या कार्यकाळात मुंबईमध्ये नवीन टर्मिनस उभे राहिले, याचा मला गर्व आहे, असेही ते म्हणाले.
अलिबाग ते पेण दरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार करण्यात येत असून यामुळे अलिबागहून मुंबई गाठणे शक्य होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १८० नवीन सरकते जिने लावण्यात येणार आहेत. त्यामुळे महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
मुंबईमध्ये सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पुलांची कामे सुरू असून भविष्यात यांची दुप्पट सुविधा मिळणार आहे. नव्या प्रकल्पांमुळे मेगाब्लॉक घेण्यात येतो, त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांची तेवढी तयारी निश्चित आहे, असेही गोयल म्हणाले.
याप्रसंगी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार अरविंद सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे,
आमदार राज पुरोहित, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा,
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. खुराणा, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के. जैन,
पश्चिम रेल्वेचे विभागीय
व्यवस्थापक सुनील कुमार उपस्थित
होते.
>रेल्वेचे ५० टक्के काम एकट्या मुंबईमध्ये
२०१४ पर्यंत फक्त लिफ्ट ३ होत्या. त्यानंतर ७८ लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत. १६ लिफ्टचे काम सुरू आहे. भविष्यात १७० लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. २०१४ पर्यंत ११२ सरकते जिने होते. त्यानंतर ३८ सरकते जिने उभारण्यात आले. १८० नवीन सरकत्या जिन्यांना मंजुरी मिळाली आहे. २०१४ पर्यंत ३२० पादचारी पूल होते. मात्र नव्याने १३० पादचारी पुलांचे काम सुरू आहे. देशातील कामामध्ये एकूण ५० टक्के रेल्वेचे काम मुंबईमध्ये झाले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
>राज्यभरातील रेल्वे सुविधांचे उद्घाटन
परळ उपनगरी टर्मिनससह कुर्ला, सायन, दिवा, गुरुतेग बहादुर नगर, महालक्ष्मी, पालघर येथील पादचारी पुलांचे उद्घाटन करण्यात आले आहे. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ, बदलापूर स्टेशनवरील सुधारणा, सरकत्या जिन्यांचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस आणि मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी-डोंबिवली १५ डब्यांच्या लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या लोकलला सेफ्टी सेन्सर असलेला निळा दिवा बसविण्यात आला होता.
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सुरत-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस, वलसाड-पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-सुरत फ्लाइंग राणी एक्स्प्रेस यांच्या अत्याधुनिक डब्यांचे उद्घाटन.
लोणावळा, इगतपुरी स्थानकांचा पुनर्र्विकास, नेरळ-माथेरान गाडीचे विस्टाडोम डबे यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली या नवीन स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले. अंबरनाथ स्थानकात नवीन पादचारी पूल, ५ सरकते जिने, तर बदलापूर स्थानकात दोन नवीन पूल, २ सरकते जिने बसविले जाणार आहेत.
पेण-थळ मार्गिका आणि जसाई-उरण असे ४६ किमी विद्युतीकरण करण्यात आले आहे.
>नवीन प्रकल्प
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गिका
८४.४४ किमी
८ नवीन रेल्वे स्थानक
९०५ कोटी रुपये खर्च
२०२३ साली पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
>कल्याण-मुरबाड नवीन रेल्वे मार्गिका (उल्हासनगर मार्गे)
२८ किमी मार्ग
७ रेल्वे स्थानक
७२६ कोटी रुपये खर्च
२०२३ साली पूर्ण करण्याचे उद्दिष्ट