मुंबई : वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांची लाहीलाही होत असताना याचा फटका रेल्वे रुळांना बसत आहे. सोमवारी उन्हामुळे रेल्वे रूळ प्रसरण पावल्याने आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर नगर ते चेंबूर स्थानकादरम्यान दुपारी १२ वाजणाच्या दरम्यान उन्हामुळे रूळ प्रसरण पावल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आपत्कालीन ब्लॉक घोषित करण्यात आला. दुपारी १२ ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेऊन रुळ दुरुस्तीचे काम करण्यात आले. या ब्लॉकमुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.याआधी एप्रिल महिन्यातही उन्हामुळे रेल्वे रूळ प्रसरण झाल्याने तीन वेळा ब्लॉक घेण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. मध्य रेल्वेवरील उल्हासनगर ते कल्याणदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर, सीएसएमटी दिशेकडील हार्बर मार्गावरवडाळा ते शिवडीदरम्यान तर हार्बर मार्गावरील रे रोड ते कॉटनग्रीन स्थानकादरम्यान रेल्वे रूळ प्रसरण पावल्याच्या घटना घडल्या होत्या.
रूळ प्रसरण पावल्याने हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:18 AM