रेल्वे कारभारावरील रागाने लोकलवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:46 AM2019-07-20T00:46:52+5:302019-07-20T00:46:57+5:30
रेल्वेच्या कारभाराविषयी राग व्यक्त करण्यासाठी काही समाजकंटक रेल्वेवर दगडफेक करतात़ जवळची व्यक्ती रेल्वे प्रवासात दगावल्याने मानसिक खच्चीकरण होते
मुंबई : रेल्वेच्या कारभाराविषयी राग व्यक्त करण्यासाठी काही समाजकंटक रेल्वेवर दगडफेक करतात़ जवळची व्यक्ती रेल्वे प्रवासात दगावल्याने मानसिक खच्चीकरण होते व त्यातूनच काही वेळा रेल्वेवर दगड मारला जातो़ तर बहुतांश वेळा भिकारी, गर्दुल्ले, माथेफिरू दगडफेक करतात, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी दिली़
धावत्या लोकलवर दगडफेक करून प्रवाशांना गंभीररीत्या जखमी करणाऱ्या इसमाला पोलिसांनी गजाआड केले आहे. दगडफेक करणारे मानसिकता खचलेले असल्याचे प्राथमिक स्वरूपात जाणवल्याचे सुरक्षा पथकाने सांगितले. अशा घटनांवर आळा बसण्यासाठी कांजूरमार्ग ते सायन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला या रेल्वे परिसरात पोलिसांची गस्त वाढली आहे.
१६ जुलै रोजी दुपारी ३.१७ वाजता दादर ते कल्याण धिमी लोकल कुर्ला ते विद्याविहार येथून जात असताना अज्ञात इसमाने धावत्या लोकलवर दगड फेकला. यात प्रवासी रत्नदीप चंदनशिवे यांच्या उजव्या हाताला गंभीर इजा झाली. याच दिवशी दुपारी ४.३५ वाजता कुर्ला स्थानकावरून आसनगाव लोकल सुटली. लोकल कुर्ला ते विद्याविहार स्थानकांदरम्यान असताना बाहेरून दगड फेकण्यात आला. यात प्रवासी अजय कहार यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली.
या दोन्ही घटनांचा तपास पोलिसांकडून केला जात होता. यामध्ये गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका महिला प्रवासीने सांगितले की, कुर्ला रेल्वे स्थानकालगत एक इसम लोकलवर दगड मारत आहे. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या इसमाला पकडले. इसमाची चौकशी केली असता त्याने राकेश रोड (३५) असे नाव सांगितले. चौकशी करत असताना लोकलवर सतत दगड फेकत असल्याचे त्याने कबूल केले. मात्र लोकलवर दगड का मारतो, याचे कारण स्पष्ट केले नाही.
>दगड फेकणाऱ्यांची अशी असते मानसिकता
रेल्वेच्या कारभाराविषयी राग व्यक्त करण्यासाठी दगड फेकला जातो.
रेल्वे प्रवासात प्रवाशाचा मृत्यू होतो. अशा वेळी जवळची व्यक्ती आपल्यात नसल्याने मानसिक खच्चीकरण होते. परिणामी खचलेल्या मानसिकतेच्या व्यक्तीकडून दगडफेकीची घटना होते.
भिकारी, गर्दुल्ले, माथेफिरू यांच्याकडून विनाकारण दगड धावत्या लोकलवर भिरकावला जातो.
धावत्या लोकलवर दगडफेकीच्या घटनेवर लगाम लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्याकडून पेट्रोलिंग करण्यात येत आहे. रेकॉर्डवरील आरोपी, गुन्हेगाराची चौकशी करणे सुरू आहे. रेल्वे रुळालगत असलेल्या वस्तीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करणे सुरू आहे. यासह पोलिसांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जात आहे.
- एम. एम. मकानदार, पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ
>दगडफेकीच्या घटना ज्या ठिकाणी झाल्या आहेत, अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कांजूरमार्ग ते सायन या पट्ट्यात दगडफेकीच्या घटना जास्त होत आहेत. येथे सुरक्षा व्यवस्थेसाठी गस्ती पथके वाढविली आहेत. कांजूरमार्ग-विक्रोळी-घाटकोपर-विद्याविहार या मार्गावर १६ आणि दादर-कुर्ला-विद्याविहार या मार्गावर २० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात केले आहेत. दगडफेक करणाºया आरोपींच्या मानसिकतेचे कारण शोधून यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. मोटरमन, गँगमन, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने दगडफेक करणाºयांचा शोध घेतला जात आहे.
- अश्रफ के.के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे
>घडलेल्या घटना
कुर्ला स्थानकादरम्यान मंगळवारी दगडफेकीच्या चार घटना घडल्या. या दगडफेकीमध्ये चार प्रवासी जखमी झाले. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तीन घटना, तर कुर्ला ते टिळकनगर या दरम्यान एक दगडफेकीची घटना घडली.
मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान धावत्या लोकलवर दगडासारखी कठीण वस्तू भिरकावल्याने रेल्वे सुरक्षा बलाचा जवान गंभीररीत्या जखमी झाला होता.
घाटकोपर स्थानकावर लोकलमधून उतरत असताना महिला डब्याच्या दिशेने कठीण वस्तू भिरकावण्यात आली. यामध्ये एक तरुणी जखमी झाली.