पहाटेची लाेकल बंद करण्याच्या निर्णयाविराेधात ‘रेल राेकाे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:16 AM2020-12-04T04:16:19+5:302020-12-04T04:16:19+5:30
पालघर, सफाळे रेल्वे स्थानकांत आंदाेलन : लाेकल, लांब पल्ल्याची गाडी धरली राेखून लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : डहाणू-चर्चगेट ही ...
पालघर, सफाळे रेल्वे स्थानकांत आंदाेलन : लाेकल, लांब पल्ल्याची गाडी धरली राेखून
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : डहाणू-चर्चगेट ही पहाटे ४.४० वाजता सुटणारी लाेकल गुरुवारपासून बंद करण्याच्या निर्णयाविराेधात बुधवारी पहाटे पालघर, सफाळे रेल्वे स्थानकांत शेकडाे प्रवासी रुळांवर उतरले. त्यांनी रेल राेकाे करून राजधानी सुपरफास्ट एक्स्प्रेससह लाेकल ट्रेन राेखून धरल्याने मुंबईच्या दिशेने हाेणारी रेल्वे वाहतूक तासभर ठप्प झाली हाेती. अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाेबत चर्चा केल्यानंतर सकाळी ६.५८ मिनिटांनी रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लाेकल सेवेवर परिणाम झाला.
मुंबईमधील हॉस्पिटल, बीएमसी, अत्यावश्यक सेवा, माझगाव डॉकमध्ये सकाळी पहिल्या पाळीला कामावर जाणारे कर्मचारी, भाजी, मासे, दूधविक्रेते यांच्यासाठी पहाटेच्या लोकलची आवश्यकता असल्याने डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने ११ जुलैला पत्रान्वये पश्चिम रेल्वेजवळ मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने डहाणूवरून पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी चर्चगेटकडे जाणारी लोकल सुरू करण्यात आली हाेती. गुरुवारपासून ही लोकल बंद करण्यात येणार असल्याचे कळल्यानंतर पहाटे ५ वाजून २३ मिनिटांनी पालघरमध्ये लोकल पकडण्यासाठी जमलेल्या प्रवाशांनी उपस्थित रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांना जाब विचारला. यात काही अंशी तथ्य असल्याचे कळल्यानंतर पालघर रेल्वे स्थानकात उपस्थित शेकडो प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदविला. दुसरीकडे मुंबईकडे जाणारी सौराष्ट्र एक्स्प्रेस ही पालघरला ५ वाजून ५ मिनिटांनी थांबणाऱ्या ट्रेनची वेळ बदलून २ वाजून ४५ मिनिटांनी केली. या ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस पालघर येथून राेजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडवू लागल्याने संघर्षाची ठिणगी पडत हाेती. त्याच वेळी लोकल बंद करताना सौराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ बदलल्याने मुंबईत पहिल्या पाळीच्या वेळेस कार्यालयात पोहोचणे शक्य होणार नसल्याने प्रथम सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सर्व प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून आपला रोष व्यक्त केला. सोशल मीडियावरून याची माहिती कळताच सफाळे रेल्वे स्थानकातही प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून रेल्वे सेवा ठप्प केली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाेबत चर्चा केल्यानंतर सकाळी सहा वाजून ५८ मिनिटांनी रेल्वे वाहतूक सुरू झाली.
पश्चिम रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने चाललेली वाटचाल आता प्रवाशांच्या लक्षात येऊ लागली आहे. झेडबीटीटी(झीरो बेस टाइम टेबल)च्या अनुषंगाने डहाणू ते वैतरणा दरम्यानचे अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अनेक लोकल गाड्यांचे टाइम टेबल प्रवाशांना कुठलीही पूर्वकल्पना न देता बदलण्यात आल्याचे प्रवासी संघटनेचे प्रथमेश प्रभू-तेंडोलकर यांनी सांगितले.
‘ती’ लोकल बंद होणार नाही
रेल राेकाे केल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर १० मिनिटे उशिराने लाेकल धावत हाेत्या. तर एक लांब पल्ल्याची गाडी थांबविण्यात आली. मात्र पहाटे चालवण्यात येणारी ‘ती’ लोकल बंद होणार नाही. तसेच डहाणू ते चर्चगेटदरम्यानच्या उपनगरीय गाड्यांचे लाॅकडाऊनपूर्वीचे वेळापत्रक लागू केले आहे. मात्र, प्रवाशांकडून लाॅकडाऊनमधील वेळापत्रकानुसार गाड्या चालविण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीवर विचार करून आम्ही निर्णय घेऊ, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
कारवाईची शक्यता?
बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेसोबत उपाधीक्षकांची चर्चा झाली. यावेळी हे आंदोलन पूर्वनियोजित होते का याबाबत विचारणा झाली. मात्र पहाटेची लोकल गुरुवारपासून रद्द होणार असल्याचे समजताच प्रवाशाची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचे संस्थेने सांगितले. पण या आंदोलनात सहभागी आंदोलकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.