Join us

हार्बर मार्गावर रेल रोको आंदोलन

By admin | Published: December 14, 2015 1:48 AM

अनियमित पाणीपुरवठा आणि येणारे अशुद्ध पाणी याविरोधात हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकाजवळ रेल्वे वसाहतीतील रहिवाशांकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.

मुंबई : अनियमित पाणीपुरवठा आणि येणारे अशुद्ध पाणी याविरोधात हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकाजवळ रेल्वे वसाहतीतील रहिवाशांकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. संध्याकाळी करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे मेगाब्लॉकनंतर सुरू झालेली हार्बर सेवा कोलमडली आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. रविवारी हार्बर मार्गावर असलेला चार तासांचा मेगाब्लॉक संपत असतानाच जुईनगर येथील रेल्वे वसाहतीतील रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या वसाहतीत जवळपास २00 कुटुंबे राहतात. गेल्या दोन महिन्यांपासून वसाहतीत अनियमित आणि अशुद्ध पाणी येत असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. एकूणच आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वसाहतीतील रहिवाशांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आंदोलन केले. यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरून बाजूला केल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास हार्बर मार्ग पूर्ववत करण्यात आला. या आंदोलनामुळे हार्बर मार्गावरील लोकल २० मिनिटे उशिराने धावत होत्या. (प्रतिनिधी)