दादर स्टेशनमध्ये रेल रोको; तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले रुळांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:04 AM2024-01-24T07:04:29+5:302024-01-24T07:05:13+5:30
इतके दिवस आमदार फोडण्यात व्यग्र असलेले सरकार आता विविध परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीला संरक्षण देत आहेत.
मुंबई : तलाठी परीक्षेतील पेपरफूट आणि भरती घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मंगळवारी दादर स्टेशनमध्ये रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ खोळंबली होती. या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेवरील बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिस आणि रेल्वे राखीव दलाने (आरपीएफ) आंदोलकांना हटविल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
इतके दिवस आमदार फोडण्यात व्यग्र असलेले सरकार आता विविध परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीला संरक्षण देत आहेत. आरोपींवर ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही. जोपर्यंत तलाठी भरती घोटाळ्यांची एसआयटी चौकशी होत नाही, तोपर्यंत राज्यात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू राहील, असे युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले.२१० आमदारांचे समर्थन असलेल्या सरकारकडून विद्यार्थ्यांकडे पुराव्यांची मागणी करणे लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारला बदनाम करू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे उद्गार महसूलमंत्र्यांनी काढणे अशोभनीय आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. विद्यार्थ्यांसाठी हा लढा असल्याचे युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक झालेल्या आंदोलनामुळे दादर रेल्वे स्टेशनमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तसेच पुढील ४० ते ५० मिनिटे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. आठ ते दहा आंदोलकांनी बोरीवलीकडे जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील गाडी अडवली. ही गाडी साधारण १५ मिनिटे उभी होती.