आसनगाव- मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराला वैतागलेल्या प्रवाशांनी मंगळवारी सकाळी आसनगाव स्थानकात रेलरोको केला. रेल्वे स्थानकावरून लोकल सोडण्याच्या आधी एक्स्प्रसेला ग्रीन सिग्नल दिल्याने आसनगाव स्टेशनवर मंगळवारी सकाळी आडेआठच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी रेलरोको केला. आसनगाववरून साडेआठ वाजता सुटणारी गाडी स्थानकावर असताना त्याचवेळी मनमाड मुंबई मार्गे जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस आसनगाव स्थानकावर सकाळी आली. त्याचवेळी आसनगाव स्थानकातून राज्यराणी एक्स्प्रेसला आधी सिग्नल देण्याची शक्यता प्रवाशांना वाटल्याने त्यांनी लोकल आधी सोडण्याची मागणी केली. या मागणीसाठी लोकलमधील प्रवासी ट्रॅकवर उतरले होते. पण काही मिनिटातच रेल्वे प्रशासनाने लोकल आधी सोडण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आसनगाव स्थानकावर झालेल्या रेेलरोकोमुळे आडेआठ वाजताची लोकल 15-20 मिनिट उशिराने निघाली.
दरम्यान, मंगळवारी सकाळी आसनगाव स्थानकात रेलरोको करणाऱ्या प्रवाशांवर जीआरपीकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे. आसनगाव रेल्वे स्थानकात रेलरोको झालाच नसल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मध्य रेल्वेच्या सातत्याने बिघडत असलेल्या वेळापत्रकामुळे प्रवासी पूर्णपणे वैतागले आहेत. त्यामुळे आज आसनगाव स्थानकात रेलरोकोचा निर्णय प्रवाशांनी घेतला.