Join us

Lower Parel Bridge Closed : लोअर परेल पुलावरून रेल्वे प्रशासन आणि महापालिका आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 5:09 PM

Lower Parel Bridge Closed : रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका या पुलाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

मुंबई- लोअर परेल पूल धोकादायक असल्याचं सांगत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल बंद करण्यात आल्यानं चिंचोळ्या गल्लीतून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. वाहतुकीसाठी पूल बंद केला खरा पण अद्यापही या पुलाची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही. रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका या पुलाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.रेल्वेनं महापालिकेला पत्र लिहून हा पूल तुम्ही बांधा, असं सांगितलं आहे. पत्राच्या माध्यमातून रेल्वे प्राधिकरणानं स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आता महापालिका या पत्राला काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे. नवी पूल कधी बांधणार, निविदा कधी निघणार आणि किती दिवसांत हा पूल बांधून तयार होणार हे सर्व प्रश्न अधांतरीच आहेत. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या यांच्या या वादात सामान्य मुंबईकरांचे अतोनात हाल होणार आहेत. हा पूल बंद करण्यात आल्यामुळे मुंबईतल्या वाहतुकीचा बो-या वाजणार आहे.दक्षिण मुंबईतील 'कॉर्पोरेट हब' अशी ओळख असलेल्या लोअर परळ परिसरात अनेक खासगी समूहाची मुख्य कार्यालयं आहेत. तर लोअर परळ येथून वरळी दिशेने जाणाऱ्या मार्गावर गणपतराव चाळ या ठिकाणी मध्यमवर्गीयांचीही मोठी वस्ती आहे. पादचाऱ्यासाठी पूल बंद असल्याने पुलाखालील चिंचोळ्या भागात स्थानिकांच्या दुचाकीसह, टॅक्सी, लहान टेम्पो, हातगाडी अशी वाहने उभ्या असल्याने नागरिकांना प्रत्यक्ष रहदारी करण्यासाठी अतिशय कमी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सकाळी गर्दीच्यावेळी कामावर जाणा-या प्रवाशांचा एकच गोंधळ उडत आहे.गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये महापालिका यंत्रणेने गर्दी नियोजनासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था अद्यापही केलेली नाही. लोअर परेल स्थानकावर सायंकाळी गर्दी नियोजनासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त जवान गर्दी नियोजनासाठी नियुक्त करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. परंतु ते लवकरात लवकर तैनात करणं गरजेचं आहे. जेणेकरून पुन्हा एलफिन्स्टन पूल दुर्घटनेसारखी दुसरी दुर्दैवी घटना घडू नये.    

टॅग्स :लोअर परेलमुंबई लोकलमुंबई महानगरपालिकारेल्वे