मुंबई :महिलांच्यालोकल प्रवासासाठी आम्ही सज्ज असून स्थानकावरील गर्दी टाळण्याची आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
उपनगरी रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक सेवा आणि इतर क्षेत्रांतील प्रवाशांसाठी खुली केली जात आहे. परंतु खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांनालोकलमधून प्रवासास अद्याप परवानगी नाही. त्यांना परवानगी मिळावी यासाठी रेल्वे प्रवासाची मुभा द्या, अशी विनंती राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला केली होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून पुढे शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा असावी, असे सरकारने म्हटले होते.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, ६ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून सर्व महिलांसाठी लोकल सुरू करण्याबाबत पत्र आले होते. त्याचे उत्तर त्यांना दिले आहे. रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या दररोज ७०० लोकल फेºया होतात. यातून दररोज ३.२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामध्ये गर्दीच्या काळात दोन महिला विशेष लोकल चालवल्या जात आहेत. कोरोना नियमावली पालनाबाबत आणि फिजिकल डिस्टन्सिंग तसेच इतर नियम निश्चित झाल्यानंतर सर्व महिलांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल.
सर्व महिलांना लोकलने प्रवासास परवानगी देता येईल, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने घ्यायला हवी.