वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासन धावून आले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 06:16 PM2020-04-24T18:16:48+5:302020-04-24T18:17:23+5:30
१ हजार ५० पीपीई किटची निर्मिती
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर, इनट्यूबेशन बॉक्स तयार केलेत. आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ हजार ५० पीपीई किटची निर्मिती केली आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत सुरक्षित राहणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी 1 हजार 50 पीपीई सूट तयार केले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार करताना सुरक्षितता बाळगण्यासाठी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने पीपीई किटची निर्मिती केली आहे. मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना किट देण्यात आले आहेत. हे रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे भारतातील रेल्वेचे एकमेव रुग्णालय आहे. या रुग्णा लयात 172 खाटांची क्षमता सुविधा आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मापदंडानुसार आणि विशेष सूचनांचे मंजूर केलेल्या कापडाने कठोर गुणवत्ता नियंत्रणाखाली लोअर परळ वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी दररोज 200 ते 225 सूट तयार केले. उत्पादन अधिक वाढविण्यासाठी, महालक्ष्मी कार्यशाळा जगजीवनराम रुग्णालयातील दररोज बुटांच्या कव्हरसह 200 सूट तयार करण्यात आले.
जगजीवनराम रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई सूटची आवश्यकता होती. भारतीय रेल्वेने लोअर परळ वर्कशॉप आणि उत्पादन विभागांकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई सूट तयार करण्याचे काम सोपविले. वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम सुरुवात करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बुटासाठी सुरक्षा कव्हरसह 1हजार 50 पीपीई सूट तयार केले आहेत. त्यामुळे जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये 80 हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत असलेल्या वैद्यकीय टीमसाठी पीपीई सूट महत्वाचे ठरले आहे.
-------------------------------
मध्य रेल्वे २५ हजार पीपीई तयार करणार
भारतीय रेल्वेने १.५ लाख पीपीइ किट पैकी मध्य रेल्वे २५ हजार पीपीई किट तयार करणार आहे. प्रत्येक बनवलेल्या कवरऑलसाठी रेल्वेला जीएसटीसह ४२२ रुपये खर्च येईल. तर बाजारात हेच ८०८.५० रुपयात उपलब्ध आहे. मध्य रेल्वेने स्वत: संपूर्णपणे पीपीई बनविण्यामुळे मोठा फायदा होईल, कारण यामुळे रेल्वे कर्मचार्यांना संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळेल. मध्य रेल्वेच्या परळ आणि माटुंगा कार्यशाळेत शिवण्यात येणार आहेत.
-------------------------------