Join us

समस्यांचे मूळ एसी लोकल तर नाही ना? सुखसोयी, सुविधा पुरवण्यावर रेल्वे प्रशासनाने भर द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:39 AM

प्रवाशांना सुखसोयी मिळतील, याकडे लक्ष द्या, अशा अनेक उपाययोजना रेल्वे प्रवाशांनी सुचविल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील उपनगरी मार्गांवर वातानुकूलित (एसी) लोकल वाढविण्यापेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा. एसी लोकलचे तिकीट कमी करा. वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करा. महिलांसाठी पुरेसे सुरक्षारक्षक तैनात करा. रोज प्रवाशांना सुखाने प्रवास करता येईल, अशा उपाययोजना करा. सुशोभीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, हे करताना प्रवाशांना सुखसोयी मिळतील, याकडे लक्ष द्या, अशा अनेक उपाययोजना रेल्वे प्रवाशांनी सुचविल्या आहेत.

लोकल सामान्य प्रवाशांसाठी गरजेची आहे. ब्रिटिशांच्या काळापासून ज्या ट्रेनच्या सुविधा आहेत; त्यात आपण काय वाढ केली, हा अभ्यासाचा विषय आहे. सर्वच राजकीय पक्षांनी किती वाढ केली आहे, हा प्रश्न आहे, मुंबईसारख्या शहरात मेट्रोसारखे प्रकल्प आणून धोका निर्माण झाला आहे. लोकल जी जमिनीवर धावते त्याचे चार ते दहा पदरी ट्रॅक केले असते तर अडचणींचा सामना करावा लागला नसता. -गणेश शिंदे

मागील काही वर्षात उपनगरी रेल्वेच्या ठरावीकच स्थानकांचा विकास झालेला दिसून येतो आहे. तिन्ही मार्गावरील असंख्य स्थानके गतप्राण अवस्थेत आहेत. मागील खासदारांनी याकडे दुर्लक्ष केले. प्रवाशांनी मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या उमेदवाराला जाब विचारायला हवा.- संदीप पटाडे

महिला विशेष ट्रेनप्रमाणे केवळ पुरुषांसाठी अशी एक लोकल गर्दीच्या वेळी तिन्ही मार्गावर चालवली जाऊ शकते. त्याने सगळे डबे पूर्ण वापरले गेल्याने गर्दी कमी होण्यास मदत होईल. स्टेशनवर साध्या वेशातील पोलिस तैनात केले तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगले राहील.- हर्षद माने

विरारहून बोरीवली करिता चालविल्या जाणाऱ्या लोकल गोरेगावपर्यंत केल्या पाहिजेत. ज्या लोकल बोरीवलीत रिकाम्या होतात, तेव्हाच बोरीवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दी वाढते. त्यामुळे कांदिवली, मालाडमधील प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश करता येत नाही. कधी कधी बोरीवलीला पॅसेज फुल होतो आणि आत लोकलमध्ये सीट रिकाम्या असतात.- पंकज त्रिवेदी 

गर्दीच्या वेळेतील लोकल फेऱ्यांचे नियोजन थोडे अजून सुधारले पाहिजे, जेणेकरून गर्दीचे नियोजन होईल. लोकल फेऱ्यांच्या वेळात सुसूत्रता आली पाहिजे. हार्बर मार्ग हा गोरेगावपर्यंतच असून त्याचे विस्तारीकरण बोरीवलीपर्यंत झाल्यास फायदा होईल. हे काम रखडले आहे. ते लवकर पूर्ण झाले पाहिजे. तिन्ही मार्गावरील महिला विशेष लोकलचे फेऱ्यांचे नियोजन योग्य पद्धतीने झाले पाहिजे.- संदेश कोलापटे

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेपश्चिम रेल्वेएसी लोकल