रेल्वे प्रशासनाला आली जाग, ठिकठिकाणी पुनर्बांधणीचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:04 AM2019-04-14T06:04:12+5:302019-04-14T06:04:29+5:30
हिमालय पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.
कुलदीप घायवट
मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी जीर्ण पुलांची पाहणी सुरू केली आहे. धोकादायक पूल बंद करून त्याची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे.
हिमालय पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांच्या पाहणीचे काम वेगाने सुरू केले आहे. सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील मशीद दिशेकडील जिन्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर आयआयटी, पालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाने २३ पुलांचे सुरक्षा आॅडिट करण्यास सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील २७६ पुलांपैकी २९९ पुलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यापैकी ओव्हर ब्रिज ८९, तर १९१ पादचारी पूल आहेत. यापैकी ८१ ओव्हर ब्रिज आणि १७८ पादचारी पुलांचे सुरक्षा आॅडिट करण्यात येणार आहे, तर इतर १९ पुलांपैकी १७ पुलांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित २३ पुलांचे आॅडिट करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
>धोकादायक पूल बंद
कल्याण, दिवा, मुंब्रा, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवरील धोकादायक पादचारी पूल बंद केले आहेत. यासह पादचारी पुलाला जोडलेल्या जिन्याची दुरुस्ती सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर, मरिन डाइव्ह, चर्नी रोड, मालाड, नालासोपारा, नायगाव या स्थानकांवरील जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू आहे. नवीन पूल उभारण्यात येत आहेत. दरम्यान, १७ मार्च ते १६ जून या ९० दिवसांच्या कालावधीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकावरील फलाट क्रमांक एक येथील पादचारी पुलाला जोडलेला रॅम्प दुरुस्तीसाठी बंद ठेवला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील विलेपार्ले स्थानकावरील चर्चगेट दिशेकडील पादचारी पूलही दुरुस्तीसाठी ६ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे.
दुर्घटनेची भीती
२ एप्रिलपासून कुर्ला स्थानकावरील घाटकोपर दिशेकडील पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल मध्य रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी बंद केला आहे. यामुळे पुलावर गर्दीचा ताण वाढत आहे.कुर्ला स्थानकावरील इतर पर्यायी पादचारी पुलांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या पादचारी पुलावर गर्दीचा भार वाढून कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
वळसा घालून प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील पादचारी पुलाचा जिना दुरुस्तीसाठी बंद आहे. २६ एप्रिलपर्यंत या जिन्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.