मुंबई-
रेल्वेनं आज मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करत एसी लोकलच्या तिकीट दरात थेट ५० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे बोर्डानं मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करण्याच्या मागणीला मंजुरी दिली असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली. ते मुंबईत भायखळा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात उष्णतेची लाट असताना मुंबईकरही उकाड्यानं हैराण झाले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास 'गारेगार' करणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर कमी करुन रेल्वेनं मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेनं एसी लोकल सेवा सुरू केली होती. पण एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात होती. एसी लोकल सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असली तरी तिकीट दर जास्त असल्यानं या लोकलला हवातसा प्रतिसाद देखील मिळत नव्हता. तसंच तिकीट दर कमी करावेत अशी मागणी देखील प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती.
मध्य रेल्वे प्रशासनानं एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच इतर प्रवाशांचं सर्वेक्षण देखील केलं होतं. यामध्ये सर्व प्रवाशांनी तिकीट दर कमी करण्याची मागणी करण्याचं प्रशासनाला सुचविलं होतं. मध्य रेल्वेकडून पाच हजार प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये एसी लोकलबाबत प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचं तिकीट कमी करण्याची मागणी केली होती. यासह एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येण्याची मागणी ९५ टक्के प्रवाशांनी केली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आली होती. आता याच सर्व मागण्यांचा मागावो घेत रेल्वे प्रशासनाकडून तिकटी दरात घट करण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.