रेल्वेचे पूल बंद... प्रवाशांचे हाल सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 12:42 AM2019-05-02T00:42:07+5:302019-05-02T06:14:06+5:30
त्यानंतर सर्व पुलांवरील ओझे तपासण्याचा निर्णय झाला. मात्र हे ऑडिट ज्यांनी केले, त्यांच्याच कामावर शंका उपस्थित व्हाव्या, अशी वेळ आली.
मुंबई - हिमालय पूल दुर्घटना घडल्यानंतर त्या पुलाच्या जबाबदारीवरून नेहमीप्रमाणे महापालिका आणि रेल्वेत चालढकल झाली. नंतर पालिकेने जबाबदारी मान्य केली, पण याच पुलाची रेल्वेच्या हद्दीतील बाजू वाढवण्याचा आणि त्यामुळे रहदारी वाढून पुलावर गर्दीचा ताण पडल्याचा नवा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान, चौकशीदरम्यान उपस्थित झाला. यापूर्वी अंधेरीतील गोखले पुलालगतचा पादचारी पूल पडला तेव्हाही त्यावरील क्षमतेपेक्षा अधिक ओझ्याचा मुद्दा अहवालात पुढे आला होता. त्यानंतर सर्व पुलांवरील ओझे तपासण्याचा निर्णय झाला. मात्र हे ऑडिट ज्यांनी केले, त्यांच्याच कामावर शंका उपस्थित व्हाव्या, अशी वेळ आली.
हिमालय पूल दुर्घटनेनंतर न्यायालयाने टीकास्त्र सोडल्यानंतर रेल्वेने जुन्या झालेल्या पुलांची पाहणी करून ते वापरासाठी बंद करण्याचा
सपाटा लावला. सीएसएमटी, माटुंगा, दादर, कुर्ला, विक्रोळी, भांडुप, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, मरिनलाइन्स, चर्नीरोड, महालक्ष्मी,
लोअर परळ, खार रोड, विलेपार्ले, भाईंदर, गुरू तेगबहादूर नगर येथील पूल सध्या बंद आहेत. पण या पुलांची दुरूस्ती किती काळात व्हावी, याचे कोणतेही धोरण नसल्याने सध्या ‘पूल बंद आणि चेंगराचेंगरी सुरू’ अशी अवस्था येथे पाहायला मिळते. लोअर परळचा उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन झाले, तेव्हा वर्षभरात हे पाडकाम पूर्ण होईल आणि नवा पूल बांधून पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. त्याला सहा महिने उलटले, पण अजून सध्याचाच पूल पाडला गेलेला नाही. त्यामुळे नवा पूल कधी बांधला जाईल त्याची वाट पाहणे प्रवाशांच्या हाती आहे. याच स्थानकातील जुना पादचारी पूल सध्या बंद करण्यात आला आहे, पण तेथे बांधलेला नवा पूल गैरसोयीचा आहे.
तो पूल करीरोड, लोअर परळ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोनला जोडतो. पण प्लॅटफॉर्म एकवर जायचे असेल तर पुन्हा वेगळ्या पुलावर चढावे लागते.
ठाण्यातील पूलही पाडून असाच दीर्घकाळ उलटला. तेथील काम कधी पूर्ण होईल, ते कोणाला सांगता येत नाही. कल्याण-डोंबिवलीतही अशीच कामाला फक्त सुरूवात झालेली आहे. यापाठोपाठ वर्दळीच्या असलेल्या कुर्ला स्थानकातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. इतरही ज्या स्थानकांतील पूल बंद करण्यात आले आहेत, तेथील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. एक पूल बंद आणि दुसऱ्यावर होणारी अतोनात
कोंडी... त्यातून मार्ग काढमारे प्रवासी अशी स्थिती जागोजाग दिसते आहे. अनेक स्थानकांत एक पूल बंद आणि एक सुरू अशी स्थिती आहे. त्यामुळे सकाळी संध्याकाळी गर्दीच्यावेळी चेंगराचेंगरीसारखी स्थिती ठरलेली आहे. अनेकदा १५ ते २० मिनिटे स्थानकात अडकून पडण्याची वेळ येते. यात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, सुट्यांच्या काळात सामानसुमानासह बाहेर पडलेले प्रवासी अशा साऱ्यांचेच हाल होत आहेत. एखादा पूल दुरूस्तीसाठी बंद करताना त्याचे तोडकाम किती काळात होईल आणि त्यानंतर दुरूस्तीसाठी किती वेळ
लागेल, याचे साधारण वेळापत्रक ठरलेले असते. ते रेल्वेकडून पाळले जाताना दिसत नाही. सध्या फक्त पाहणी करा आणि पूल बंद करा, एवढाच कार्यक्रम राबवला जाताना दिसतो आहे. पूल बंद केला, की तेथे फलक लावले जातात. पण तेथील तोडकाम वेळच्यावेळी सुरू
होत नाही. दीर्घकाळ पूल फक्त बंद अवस्थेत असतो. त्याचे काम किती काळात पूर्ण होईल, याचे वेळापत्रक कोणत्याही स्थानकाच्या ठिकाणी लावलेले दिसत नाही. परिणामी, ठिकठिकाणच्या प्रवाशांच्या हालाला पारावर उरलेला नाही.
छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील हिमालय पूल पडल्यानंतर रेल्वेने त्यांच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या पुलांचा अभ्यास केला आणि
लागोपाठ १७ पूल बंद केले. पण या पुलांचे काम कधी पूर्ण होईल, याची कालमर्यादा ठरवलेली नसल्याने सध्या आहेत ते पूल बंद आणि इतर पुलांवर प्रचंड कोंडी अशी स्थिती प्रवासी अनुभवत आहेत. गर्दीच्या वेळी अन्य पुलांवर होणारी कोंडी भीतीदायक तर होतेच आहे, पण गडबडीच्यावेळी वेळ खाणारी ठरते आहे. हा नियोजनातील अभाव पुन्हा प्रवाशांच्या मूळावर उठला आहे.