रेल्वेच्या केबल गोदामाला आग
By admin | Published: April 5, 2015 01:33 AM2015-04-05T01:33:52+5:302015-04-05T01:33:52+5:30
रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल्स वायरच्या साठ्याला कल्याणच्या यार्डात अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
डोंबिवली : रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल्स वायरच्या साठ्याला कल्याणच्या यार्डात अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही रेल्वेच्या केबल्सचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात रबर जळण्यासह काळ्या धुराचे लोण पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते.
ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. आगीचे प्रमाण प्रचंड असल्याने तिच्या ज्वाळा वालधुनी परिसरातून दिसत होत्या. याआधीही सुमारे दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने यार्डातील केबल्सच्या साठ्यालाच आग लागल्याची घटना घडली होती. त्याचीच ही पुनरावृत्ती तर नाही ना, असा सवाल रेल्वे कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित केला. घटनास्थळी रेल्वे पोलीस दलासह कल्याण स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांनी येत पाहणी केली.
दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तातडीने घटनास्थळी हजर झाले. अधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे शिंदेंनी ही आग लागली की लावण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डॉ. अरुण कुमार सूद यांच्याकडे केली आहे.