रेल्वे साखळी बॉम्बस्फोट : १६ वर्षे उलटले, दोषींना फाशी देणार तरी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 06:55 AM2022-07-12T06:55:53+5:302022-07-12T07:01:30+5:30
कामाच्या ताणामुळे सुनावणी केली तहकूब
मुंबई : ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींना सात वर्षांपूर्वी विशेष न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र, उच्च न्यायालयाने दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे उच्च न्यायालयाने सोमवारी दोषींच्या व राज्य सरकारच्या दोषींची शिक्षा कायम करण्यासंदर्भात केलेल्या अपिलावरील सुनावणी तहकूब केली.
केवळ ११ मिनिटांत झालेल्या सात साखळी बॉम्बस्फोटात तब्बल २०९ लोकांना जीव गमवावा लागला. तर ७०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाली. याप्रकरणी विशेष मकोका न्यायालयाने नऊ वर्षांनंतर १३ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोषी उच्च न्यायालयात अपिलात आले तर दोषींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारनेही २०१५ मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केले. अपिलांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ नेमण्यात यावे, ही विनंती तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी फेटाळली. त्यानंतर या अपिलांवरील सुनावणी ज्या न्यायमूर्तींसमोर झाली, ते निवृत्त झाल्याने सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, कोरोना काळात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कमल अन्सारीचा कारागृहातच मृत्यू झाला.
ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल
सोमवारच्या सुनावणीत वकिलांनी अपिलावरील सुनावणी पूर्ण करण्यासाठी पाच-सहा महिने लागतील, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली.
‘कामाचा ताण पाहता, या अपिलांवरील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल,’ असे न्यायालयाने सांगितले.