रेल्वेची साखळी ओढणारे रडारवर; प्रवाशांकडून ६३.२१ लाखांची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:12 AM2024-07-04T10:12:56+5:302024-07-04T10:13:28+5:30

अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे.

Railway chain pullers on radar; 63.21 lakh fine from passengers | रेल्वेची साखळी ओढणारे रडारवर; प्रवाशांकडून ६३.२१ लाखांची दंडवसुली

रेल्वेची साखळी ओढणारे रडारवर; प्रवाशांकडून ६३.२१ लाखांची दंडवसुली

मुंबई : रेल्वेच्या अलार्म चेनचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. त्यानुसार, एप्रिल - २०२३ ते जून - २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेने गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली आहेत. रेल्वे कायद्यानुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६३.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

उपनगरीय आणि मेल / एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी अलार्म चेन पुलिंग (एसीपी) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ट्रेनच्या लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर (गार्ड) यांना सतर्क करण्यासाठी अलार्म चेन आणीबाणीच्या परिस्थितीत खेचता येते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि रेल्वे सेवांचा वक्तशीरपणा राखण्यासाठी ट्रेनमध्ये अलार्म चेनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

उतरणे/मधल्या स्थानकांवर चढणे इत्यादी क्षुल्लक कारणांसाठी प्रवासी या साखळीचा गैरवापर करत असल्याचे निर्दशनास आले आहे. अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. यामुळे एक वर्षापर्यंत कारावास, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

चेन केव्हा ओढावी?
आग लागल्यास 
आरोग्याशी संबंधित घटना 
गुन्हेगारी कृत्य घडल्यास
ट्रेनमध्ये चढताना वा उतरताना अपघातावेळी

गैरवापर केला तर काय होते?
मागून येणाऱ्या गाड्यांवर परिणाम
मेल / एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांना विलंब
गैरवापर केल्याने इतर प्रवाशांची गैरसोय

आणीबाणीच्या वेळी काय करावे ?
आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी पर्यायी मार्ग आहेत. ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येतो. प्रवासी तिकीट परीक्षक, १३९ हा क्रमांक डायल करता येतो. सहप्रवाशांची मदत घेता येते.

प्रवाशांनी काय करावे ?
प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे अगोदर स्थानकावर पोहोचून प्रवासाचे जबाबदारीने नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Web Title: Railway chain pullers on radar; 63.21 lakh fine from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे