मुंबई - बदलत्या काळानुसार रेल्वेनेही अनेक सुधारणा केल्या आहेत. या बदलाचा भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या डब्यावर महिला डबा दर्शविणारं चित्र बदलण्याची तयारी सुरु झाली आहे. साडी घालून डोक्यावर पदर असणाऱ्या महिलेच्या चित्राऐवजी सुटामध्ये असलेल्या महिलेचे चित्र लावण्यात पश्चिम रेल्वेने सुरु केलं आहे. तसेच महिला डब्यामध्ये बॅडमिंटण स्टार सायना नेहवाल, क्रिकेटर मिताली राज, अंतराळात जाणारी महिला कल्पना चावला यांचे फोटो आणि त्यांचे संघर्ष असणारे फलक दिसणार आहेत.
या नवीन लोगोसह आत्तापर्यंत 12 डबे बनविण्यात आले आहेत. लवकरच आणखी 2 डबे बनविण्यात येतील. मुंबई शहराच्या या वाढत्या गर्दीत दिवसेंदिवस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. विशेषत: महिला प्रवाशांची संख्या वाढत असल्याने महिलांसाठी स्पेशल ट्रेनदेखील सुरु करण्यात आल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येताना दिसत आहेत. फक्त घर सांभाळणं इथपर्यंत मर्यादित न राहता महिला यशस्वीरित्या प्रत्येक क्षेत्रात वावरताना दिसत आहे. त्यामुळे महिलांमध्ये होणारे बदल पाहता महिलांचे डबे आजच्या काळात शोभतील असे हवेत. आजच्या महिलेमध्ये आत्मविश्वास आणि आधुनिकता यांची झलक आहे. त्यामुळे महिला डब्याचे लोगो बदलण्यात येत आहेत.
दरम्यान महिलांसाठी अशाप्रकारे लोगो आणण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार होता. आजच्या महिलांचे प्रतिनिधित्व करणारा लोगो आहे. आजची महिला आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी होत आहे. अनेक डिझाइननंतर हा लोगो फायनल करण्यात आला. यामध्ये आत्मविश्वास आणि आधुनिकता दोन्हींची झलक पाहायला मिळते. या लोगोसोबतच वयोवृध्द, अपंग आणि आरक्षित डब्यांनाही रंग लावण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेवरील सर्व 110 ट्रेन्सना येणाऱ्या काळात हे लोगो लावण्यात येतील अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.