रेल्वे क्रॉसिंग जिवावर बेतले
By admin | Published: May 26, 2017 04:25 AM2017-05-26T04:25:38+5:302017-05-26T04:25:38+5:30
केरळला जाणारी गाडी पकडण्यासाठी मालगाडीवरून क्रॉसिंग करणे एका १५ वर्षांच्या मुलाच्या जिवावर बेतले. आपल्या वडिलांच्या डोळ्यांदेखत आॅस्टीन साजू (१६) या मुलाचा मालगाडीखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : केरळला जाणारी गाडी पकडण्यासाठी मालगाडीवरून क्रॉसिंग करणे एका १५ वर्षांच्या मुलाच्या जिवावर बेतले. आपल्या वडिलांच्या डोळ्यांदेखत आॅस्टीन साजू (१६) या मुलाचा मालगाडीखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री वसई रेल्वे स्टेशनवर घडली.
वसई स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक पाच व सहावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. त्यापलीकडे मालगाड्या थांबवलेल्या असतात. अनेक प्रवासी अवजड सामान जिन्यावरून घेऊन जाण्याचे टाळण्यासाठी मालगाडीखालून जातात. असाच प्रकार अॅँथनी साजू यांचा मुलगा आॅस्टीनचा जीव घेऊन गेला.
आॅस्टीन आई व बहिणीसोबत विरार येथे वडिलांकडे सुट्टीसाठी आला होता. बुधवारी रात्रीची गाडी पकडण्यासाठी सर्व जण वसईला उतरले. पाच नंबरवर गाडी येत असल्याने अँथनी व आॅस्टीन सामान घेऊन मालगाडी पार करून जात होते. तर आॅस्टीनची आई व बहीण जिन्यावरून निघून गेले. अँथनी मालगाडी उतरून पलीकडे गेले. मात्र, आॅस्टीन सामान घेऊन दोन डब्यांतून पुढे जात असतानाच मालगाडी सुरू झाली. त्यामुळे तोल गेल्याने आॅस्टीन मालगाडीखाली सापडला. अँथनी यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गाडीचे डबे आॅस्टीनच्या शरीरावरून निघून गेले होते.