मुंबई : डिजिटल व्यवहारांना चालना देण्यास रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट आरक्षणावरील काढलेले सेवा शुल्क पुन्हा सुरू केले जाणार असल्याने ई-तिकीट बुकिंग महागणार आहे. याआधी शयन श्रेणीतील (स्लीपर क्लास) ई-तिकिटावर २0 रुपये, तर वातानुकूलित आसनावर ४0 रुपये सेवा शुल्क होते. ते पुन्हा लागू केले जाणार असल्याचे पत्र रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहे. ई-तिकिटावरील सेवा शुल्क नोव्हेंबर २0१६ पर्यंत लागू होते.ई-तिकीट व्यवस्थेसाठी हा निधी भारतीय रेल्वे अन्न सेवा व पर्यटन महामंडळाकडून (आयआरसीटीसी) वापरला जात होता. वित्त मंत्रालयाच्या सूचनेनंतर हे शुल्क रद्द करण्यात आले होते. यापोटी होणाऱ्या वित्तीय हानीची भरपाई वित्त मंत्रालय करून देणार होते. त्यानंतर यंदाच्या १९ जून रोजी वित्त मंत्रालयाने रेल्वेस लेखी स्वरूपात कळविले की, ई-तिकिटावरील शुल्कासाठी भरपाई ही मर्यादित काळासाठीची तात्पुरती व्यवस्था होती.सेवा शुल्क रद्द करण्यासाठी आधी जून २0१७ पर्यंतचीच मुदत ठरविली होती. नंतर ती वारंवार वाढवली गेली. त्यानुसार आतापर्यंत सेवा शुल्क आकारले जात नव्हते. या काळात आयआरसीटीसीचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला होता. रेल्वे बोर्डाचे संयुक्त सचिव बी. एस. किरण यांनी जारी केलेल्या पत्रात रेल्वेला सेवा शुल्क पुन्हा सुरू करण्याचे अधिकार बहाल केले आहेत.
सेवा शुल्कामुळे रेल्वेचे ई-तिकीट बुकिंग महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:51 AM