मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण स्थानकापर्यंत रेल्वे विद्युतीकरण १२ नोव्हेंबर १९२८ रोजी करण्यात आले. या घटनेला ९१ वर्षे पूर्ण झाली. विद्युतीकरणामुळे दरवर्षी १२० कोटी रुपयांची बचत होते, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.१२ नोव्हेंबर १९२८ रोजी १ हजार ५०० व्हॉल्टच्या डीसी ट्रॅक्शन सिस्टमने ट्रेन सुरू झाली. हे विद्युतीकरण सीएसएमटी ते कल्याणपर्यंत केले. काही कालावधीनंतर इगतपुरी आणि पुणे या स्थानकांपर्यंत विद्युतीकरण वाढविण्यात आले. पहिली प्रवासी लोकल, डेक्कन क्वीन, इलेक्ट्रिक लोको १ जून १९३० रोजी सीएसएमटी ते पुणेदरम्यान चालविण्यात आली.१ हजार ५०० व्हॉल्टचे रूपांतर १९९६-९७ मध्ये २५ केव्ही एसी करण्यात आले. १२ नोव्हेंबर २००६ रोजी इगतपुरी ते कल्याण यादरम्यान एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर करण्यात आले. २४ नोव्हेंबर २०१० रोजी कल्याण-पुणे-लोणावळा यादरम्यान एसी ट्रॅक्शनचे काम पूर्ण झाले. कल्याण ते ठाणे डीसीचे एसी ट्रॅक्शनचे रूपांतर २४ जानेवारी २०१४ रोजी केले. ठाणे ते सीएसएमटी डीसीचे एसी ट्रॅक्शनचे रूपांतराचे काम ०८ जून २०१५ रोजी पूर्ण झाले. याद्वारे संपूर्ण मध्य रेल्वे मार्गावर २५ केवी एसी ट्रॅक्शनचा उपयोग केला.डीसीचे एसीत रूपांतर केल्याने दरवर्षी १२० कोटी रुपयांची बचत होते. ट्रान्समिशन हानी कमी झाली आहे. थ्री फेज ईएमयू, इंजीनमध्ये रिजनरेटिव ब्रेक सुरू झाले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.>६ हजार रुट किमीच्या विद्युतीकरणाचे लक्ष्य२०२१-२२ पर्यंत भारतीय रेल्वेच्या ब्रॉड गेज मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण केले जाईल. यामुळे क्षमता आणि वेग वाढेल. दरवर्षी १३ हजार ५०० कोटींचे इंधन वाचले जाईल. २०१३-१४ मध्ये ६१० रूट किमी (आरकेएम) मार्गाचे विद्युतीकरण केले होते. २०१७-१८ मध्ये ४ हजार ८७ रुट किमी (आरकेएम) मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तर, २०१८-१९मध्ये ६ हजार रुट किमी (आरकेएम) मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य आहे.
सीएसएमटी ते कल्याण स्थानकापर्यंत रेल्वेच्या विद्युतीकरण मार्गाला ९१ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:42 AM