Join us

रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :वाढत्या संसगार्मुळे १४ मार्च रोजी होणारी परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

वाढत्या संसगार्मुळे १४ मार्च रोजी होणारी परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने आठ ते दहा दिवसांत परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले आणि २१ मार्च ही तारीख जाहीर केली; परंतु २१ रोजी रेल्वेची एनटीपीसीची परीक्षा असल्यामुळे अनेक विद्यार्थांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

कोरोनामुळे गेले वर्षभर संयम राखून असलेल्या एमपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्यामुळे सरकारला परीक्षा घेणे भाग पडले; पण एमपीएससीने जाहीर केलेल्या तारखेलाच रेल्वेची ३५,२७७ पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. रेल्वेच्या परीक्षेचे परीक्षा केंद्र शहराबाहेर असल्यामुळे कोणतीही एकच परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अमरावती, औरंगाबाद येथे परीक्षा केंद्रे मिळाली आहेत. एमपीएससीची परीक्षा पूर्वनियोजित तारखेला झाली असती, तर विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता आल्या असत्या.

पुढील निर्देशांपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळा, शैक्षणिक संस्था या बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता प्रवेशपत्र सोबत ठेवून प्रवास करता येईल अशी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. रेल्वेची परीक्षा ही ३५,२७७ पदांकरिता असून, ही पाचव्या फेसमधील परीक्षा आहे. आता विद्यार्थ्यांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोना प्रकोप आणि मराठा आरक्षण यामुळे परीक्षांना स्थगिती देण्यात आली होती; परंतु आता परीक्षेची संधी मिळाली; पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना आता एकच परीक्षा देता येऊ शकणार आहे.

- विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी सध्या निर्बंध आहेत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच या परीक्षा आयोजित करण्यात आल्याने सुरक्षिततेची भीती आहेच. मात्र, या दोन्ही परीक्षा एकत्र आल्याने आता त्रेधातिरपीट उडाली आहे. कोणती तरी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे, त्यामुळे तयारी वाया जाणार आहे.

प्रबोधन राजे, उमेदवार

- जे विद्यार्थी आपल्या वयाच्या अंतिम टप्प्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेची ही शेवटची संधी होती. ते विद्यार्थी यामध्ये एका परीक्षेला हुकलेले आहेत. कोरोना प्रकोप आणि इतर कारणांमुळे या वेळेस विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे कमी चान्स मिळाले होते. विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत केली; पण आता परीक्षा एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलीही एक निवडायची आहे.

रसिका धुमाळ , विद्यार्थिनी

- एमपीएससी आणि रेल्वेची परीक्षा असल्याने विद्यार्थी तयारीला लागले होते. परीक्षेची तयारी झालेल्या विद्यार्थ्यांना निराशा हाती लागली आहे. दोनपैकी कोणत्या परीक्षेची निवड करावी हा एक खूप मोठा संभ्रम आमच्यापुढे आहे.

-रवी आपटे, उमेदवार.