फेरीवाल्यांच्या वावरामुळे रेल्वे प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:05 AM2017-10-03T02:05:19+5:302017-10-03T02:05:23+5:30
हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलमधील भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नसल्याने फेरीवाले बिनधास्तपणे वावरताना पाहायला मिळतात.
प्राची सोनवणे
नवी मुंबई : हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलमधील भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नसल्याने फेरीवाले बिनधास्तपणे वावरताना पाहायला मिळतात. या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांना गर्दीच्या वेळेतही फेरीवाल्यांना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार प्रवासी संघाकडून केली जात आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-ठाणे आणि हार्बर मार्गावरील वाशी-पनवेल या मार्गावरील लोकलमध्ये फेरीवाले, विक्रेते, भिकारी आणि तृतीयपंथींचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वच रेल्वे स्थानकांवर होमगार्ड व रेल्वे पोलीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तैनात असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या मार्गावर पोलीस व होमगार्ड यांची कमतरता भासते. रात्रीच्या वेळीही प्रवाशांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे. लोकलमधील भिकाºयांमध्ये महिला तसेच बालक यांचे प्रमाण जास्त आहे. ही लहान मुले जबरदस्तीने प्रवाशांकडून पैशांची मागणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. कॅन्सरग्रस्त मुलांना मदत म्हणून प्रवाशांना फसवून मदत निधी गोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळेतही फेरीवाले प्रवाशांना ढकलून, शिवीगाळ करून हक्क गाजवीत असल्याचे प्रकार पाहायला मिळतात. प्रवाशांनी पैसै देण्यास नकार देताच तृतीयपंथींकडून शिवीगाळ, शिव्याशाप दिले जातात. पोलिसांचा धाक दाखविला तर प्रवाशांशी वाद घालत फेरीवाल्यांकडून मनमानी केली जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. महिला प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असून, पुरुष फेरीवाल्यांकडून छेडछाड होत असल्याचे प्रवासी विनीता शिंदे यांनी सांगितले.
प्रवासी संघाकडून सुरक्षित प्रवासाची मागणी, महिला सुरक्षेसाठी होमगार्ड, पोलीस, आरपीएफ यांची नियुक्ती करून किमान महिला डब्यासमोरील सुरक्षेकडे लक्ष दिले जावे. फेरीवाल्यांच्या घुसखोरीवर वेळीच लगाम घातला, तर प्रवाशांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येऊ शकेल, असे मत नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी व्यक्त केले. फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथींवर कारवाईची जबाबदारी आरपीएफची असून आमच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाते, अशी माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली.