लॉकडाऊनच्या १०० दिवसात रेल्वेची मालवाहतूक वेगात; २.५४ लाख वॅगनमधून १३.३९ लक्ष टन मालाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 07:16 PM2020-07-01T19:16:54+5:302020-07-01T19:17:33+5:30
पश्चिम रेल्वेने मागील १०० दिवसात ६८ हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ३७२ पार्सल गाड्यामधून केली.
मुंबई: रेल्वे सेवा कोरोनामुळे बंद आहे. मात्र देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्या, पार्सल गाड्या सुरू आहेत. २३ मार्च ते ३० जून या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण २ लाख ५४ हजार वॅगनमधून १३ लाख ३९ हजार टन मालाची वाहतूक केली आहे.
लॉकडाऊनच्या १०० दिवसांत मध्य रेल्वेने ५ हजार ३०६ मालगाड्यांतून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि स्टील, सिमेंट, कांदे यांची वाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी २ हजार ५४३ वॅगन मालाची वाहतूक केली. त्यामुळेच १०० दिवसात २ लाख ५४ हजार ३३५ वॅगन मधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे शक्य झाले.
- कोळसा – १ लाख ३७१ वॅगन
- अन्नधान्य, साखर – ३ हजार ४७९ वॅगन
- खते – ९ हजार ९८० वॅगन
- कांदा – २ हजार ६८९ वॅगन
- पेट्रोलियम पदार्थ – २५ हजार ८२१ वॅगन
- लोह आणि स्टील – ५ हजार ६२२ वॅगन
- सिमेंट – १५ हजार ४६० वॅगन
- कंटेनर – ७९ हजार ६४३ वॅगन
- डी-ऑइल केक व इतर वाहतूक – ११ हजार २७० वॅगन
पश्चिम रेल्वेने मागील १०० दिवसात ६८ हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ३७२ पार्सल गाड्यामधून केली. यातून पश्चिम रेल्वेला २१ कोटी ८९ लाख रुपयांचे उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळाले.
मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. १५ जूनपासून ३६२ लोकल फेऱ्या धावत होत्या. १ जुलैपासून ७०० लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली आहे. एका फेरीमधून ७०० प्रवाशांनी प्रवास करण्याचे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.