मुंबईकरांची दुधाची तहान भागवण्यासाठी रेल्वे सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 08:20 PM2018-07-17T20:20:44+5:302018-07-17T20:22:27+5:30
८८ हजार लिटर दूध मुंबईत दाखल
मुंबई : राज्यात सुरु असलेली दूधकोंडी फोडण्यासाठी सरकारनं रेल्वेनं गुजरात येथील दूध मुंबईला आणण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजरच्या एका फेरीत तब्बल ८८ हजार लिटर दूध मुंबईत दाखल झाले. यामुळे मुंबईकरांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा रेल्वे धावून आल्याचं स्पष्ट होत आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पश्चिम रेल्वेला गुजरात येथील दूध मुंबईत नेण्याबाबत सूचना केली. यानुसार गुजरात डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे दूध मुंबईला आणण्यासाठी पॅसेंजर एक्सप्रेसला दूध वाहक बोगी जोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला. ट्रेन क्रमांक ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजरला दुधाचे दोन कंटेनर जोडण्यात आले. एका कंटेनरची क्षमता ४४ हजार लिटर आहे. यामुळे पॅसेंजरच्या एका फेरीत तब्बल ८८ हजार लिटर दूध मुंबईत दाखल झाले असून अशा एकूण १२ कंटेनरमधून गुजरात येथील दूध मुंबईत आणण्यात येणार आहे.
आगामी सूचना मिळेपर्यंत रोज अहमदाबाद-मुंबई पॅसेंजरला दोन कंटेनर जोडून गुजरात येथील दूध मुंबईत आणण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले आहे. याआधी रेल्वेनं लातूरला पाणी पुरवठा केला होता. लातूरकरांची तहान भागवण्यात रेल्वेनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्याचप्रकारे रेल्वे मुंबईकरांच्या मदतीला धावून आली आहे.