Join us  

रेल्वे अपघातग्रस्तांना नेणार थेट हेलिकॉप्टरने रुग्णालयात

By admin | Published: July 03, 2014 2:07 AM

रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमीला आता थेट हेलिकॉप्टरनेच रुग्णालयात नेण्यात येणार आहे़ यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली असून हेलिपॅडसाठी मुंबई व उपनगरातील १४ जागा निश्चित केल्या आहेत़

मुंबई : रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमीला आता थेट हेलिकॉप्टरनेच रुग्णालयात नेण्यात येणार आहे़ यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली असून हेलिपॅडसाठी मुंबई व उपनगरातील १४ जागा निश्चित केल्या आहेत़ तसेच भीषण अपघातासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जाणार आहे़ त्यामुळे जखमींना थेट रुग्णालयातच उपचार मिळतील व यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकेल़या माहितीचे प्रतिज्ञापत्र रेल्वेने बुधवारी उच्च न्यायालयात सादर केले़ रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ ट्रॅफिक जाममधून रुग्णवाहिकेने हॉस्पिटलमध्ये नेणे शक्य होत नाही़ हे बहुतांश वेळा जखमींच्या जीवावर बेतते़ यावर तोडगा म्हणून ही योजना तयार केली आहे़ यासाठी अतिरिक्त १२ हेलिपॅडदेखील तयार केले जाणार आहेत. तसेच हेलिपॅडसाठी भूखंड मिळावे म्हणून राज्य शासनाला पत्र लिहिले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने शासनाला नोटीस दिली़रेल्वे फलाटांची उंची वाढवण्याचे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे़ प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असून हे काम ३१ मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करावे व यासाठी लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले़ मोनिका मोरे हिचे रेल्वे अपघातात दोन्ही हात गेले़ याची दखल घेत न्यायालयाने हे प्रकरण सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल केले़ त्यात मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर अ‍ॅड़ सुरेश कुमार यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ (प्रतिनिधी)