रेल्वेला हवी महापालिकांची मदत, फेरीवाल्यांवरील कारवाई; मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:22 AM2017-10-16T05:22:45+5:302017-10-16T05:23:24+5:30
स्थानक आणि पादचारी पुलांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरातील क्षेत्र फेरीवालामुक्त करण्यासाठीही कारवाईची गरज आहे.
मुंबई : स्थानक आणि पादचारी पुलांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरातील क्षेत्र फेरीवालामुक्त करण्यासाठीही कारवाईची गरज आहे. सरकारतर्फे ९ आॅक्टोबर रोजी रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्याबाबत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्राची अंमलबजावणी होत नाही. रेल्वेसह स्थानिक प्रशासनाने समन्वय साधत रेल्वे स्थानके आणि परिसर फेरीवालामुक्त करणे गरजेचे आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी म्हटले आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर स्थानकातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या रेल्वे सुरक्षा बलाकडून फेरीवाल्यांवर कारवाई होते. मात्र स्थानिक महापालिका यंत्रणेनेदेखील मदत करणे गरजेचे आहे. १५० वर्षांपूर्वी असलेली यंत्रणा आज कार्यरत आहे. स्थानकावर प्रवेश करण्याचा मार्ग व बाहेर पडण्याचे मार्ग अनेक आहेत. प्रत्येक मार्गावर आरपीएफ जवान तैनात करणे अशक्य असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी सांगितले.
कारवाई कोणी करावी, याच्याशी लोकांना काहीही देणेघेणे नाही. कारवाई होणे गरजेचे आहे, असे रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता समीर झवेरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्य सरकार, पालिकेने कारवाई करावी
लोकल गाड्या धावणाºया मार्गावर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका येतात. प्रत्येक स्थानकावरील फेरीवाले हटवणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. मात्र स्थानकात प्रवेश करतानाच त्यांना रोखणे गरजेचे आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांनी अधिक तीव्र कारवाई करावी, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा म्हणाले.