कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं अजब निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेनं आता मुंबई मेट्रोपोलियन रिजन म्हणजेच MMR रिजनमधील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत ५ पटीनं वाढवली आहे. त्यामुळे १० रुपयांना मिळणारं प्लॅटफॉर्म तिकीट आता ५० रुपयांना मिळणार आहे.
कोरोनाची वाढती संख्या पाहता उन्हाळ्याच्या मोसमात प्लॅटफॉर्म होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वनं हे पाऊल उचललं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
नवे दर १५ जूनपर्यंत राहणारमे महिन्यात मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर शहराबाहेर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोनाचा काळ लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी तिकीटाची किंमत वाढविण्यात आल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. हे नवे दर १५ जूनपर्यंत लागू राहणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.