Join us

रेल्वे हद्दीतील ‘फेरी’ पडली तीन कोटींना; फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेची विशेष मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:03 AM

एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये २४ हजार फेरीवाल्यांवर कारवाई.

मुंबई : रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे, या मोहिमेंतर्गत गेल्या आठ महिन्यांत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात २४ हजार ३३९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी २४ हजार ३३४ जणांना अटक करून त्यांच्याकडून मध्य रेल्वेने तीन कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला.

न्यायालयाने रेल्वेस्थानक परिसरात ‘नो फेरीवाला क्षेत्र’ करून १५० मीटरवर सीमारेषा आखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, रेल्वेनेही सीमारेषा आखली होती. तरीसुद्धा नियम तोडून अनधिकृत फेरीवाले यांचा व्यवसाय सुरूच आहे. अनेकदा मध्य रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे; मात्र तरीही फेरीवाल्यांवर अंकुश लावण्यात रेल्वेला यश आले नाही.

  याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम घेतली होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात यशस्वी मोहीम राबविली.

मुंबईत एक कोटीची दंडवसुली :

एकट्या मुंबई विभागात ९,३९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून, ९,३९३जणांना अटक करून एकूण १.०२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वे