मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकपूर्वीच लोकलला गुरुवारी तब्बल १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क लागला. परिणामी ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच प्रवाशांना फलाटांवर लोकलची वाट पाहवी लागत असल्याने सीएसएमटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपरसारख्या मोठया रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा संताप अनावर झाला होता.गुरुवारी सकाळपासूनच मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांना लेटमार्कचा फटका बसू लागला. रेल्वे स्थानकांवर ब्लॉकची घोषणा होत नसल्याने प्रवाशांना याबाबत काहीच माहिती नव्हते. दुपारी १२ वाजेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर धावणा-या बहुतांशी लोकल या १५ ते ३० मिनिटांहून अधिक काळ विलंबाने धावत होत्या. याचा फटका भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंडसारख्या मोठया स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत होता. दुपारी रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्ये पीक अवरच्या तुलनेत गर्दी कमी असली तरी लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.
१० ते १५ मिनिटे विलंबानेगुरुवारी सायंकाळी ऐन पीक अवरला घरी जाण्याच्या वेळेला सीएसएमटीवरून सुटणा-या सर्व रेल्वे गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने सुटत होत्या. काही एसी लोकल १५ मिनिटे विलंबाने सुटणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून केली जात होती.
प्रवासी ताटकळतविद्याविहार, माटुंगा, चिंचपोकळी, करीरोड, कांजुरमार्गसारख्या लहान रेल्वे स्थानकांवर बरचवेळ प्रवासी लोकलची वाट पाहत ताटकळत असल्याचे चित्र होते.
ठाण्यात कधी ?ठाणे येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून सुरु झालेला ६३ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० पर्यंत असणार आहे.
सीएसएमटी येथे कधी ?सीएसएमटी येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी शुक्रवारी रात्री १२.३० वाजता सुरु होणारा ३६ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० पर्यंत असणार आहे.
लोकल धावणार नाहीसीएसएमटी येथील ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा दरम्यान लोकल धावणार नाही.
ठाणे ते सीएसएमटी काय ?ठाणे येथील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील १६१ लोकल फे-या शुक्रवारी रद्द करण्यात आल्या असल्या तरी ठाणे ते सीएसएमटी किती लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत ? याची माहिती देण्यास रेल्वे प्रशासनाकडून टाळटाळ केली जात आहे.
लोकल दादरपर्यंत !सीएसएमटी येथील ब्लॉकमुळे काही लोकल भायखळा तर काही लोकल दादरपर्यंत चालविण्यात येणार आहेत.
घरून काम कराब्लॉक काळात रेल्वेवर ताण पडू नये, लोकल प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून कार्यालयांनी कर्मचा-यांना घरून काम करण्याची परवानागी द्यावी, असे आवाहन रेल्वेकडून सातत्याने करण्यात येत आहे.