मोठी बातमी! महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा
By सायली शिर्के | Published: October 20, 2020 05:15 PM2020-10-20T17:15:59+5:302020-10-20T17:42:03+5:30
Mumbai Local: महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई - लोकल बंद असल्याने खासगी क्षेत्रातील महिलांचे कामावर जाताना अतोनात हाल होत आहेत. वाहतूककोंडीत अनेक तास अडकून पडावे लागत असल्याने त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून महिलांनालोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, असं विनंतीपत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डला केलं होतं. राज्य सरकारची ही विनंती रेल्वेनं फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर आता महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत" असं गोयल यांनी म्हटलं आहे.
मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020
सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा
महिलांच्या लोकल प्रवासासाठी आम्ही सज्ज असून स्थानकावरील गर्दी टाळण्याची आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असं पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. उपनगरी रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक सेवा आणि इतर क्षेत्रांतील प्रवाशांसाठी खुली केली जात आहे. आता खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांना लोकलमधून प्रवासास परवानगी दिली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून पुढे शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा असणार आहे.
सध्या पश्चिम रेल्वेच्या दररोज 700 लोकल फेऱ्या
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, 6 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून सर्व महिलांसाठी लोकल सुरू करण्याबाबत पत्र आले होते. त्याचे उत्तर त्यांना दिले होते. रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या दररोज 700 लोकल फेऱ्या होतात. यातून दररोज 3.2 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामध्ये गर्दीच्या काळात दोन महिला विशेष लोकल चालवल्या जात आहेत. कोरोना नियमावली पालनाबाबत आणि फिजिकल डिस्टन्सिंग तसेच इतर नियम निश्चित झाल्यानंतर सर्व महिलांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.