गौरी टेंबकर-कलगुटकर / मुंबई‘रेल्वेमंत्री साहेब, माझ्या जेवणात मेलेली माशी सापडली..., असे टिष्ट्वट एका रेल्वे प्रवाशाने शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केले. मुख्य म्हणजे याची लेखी तक्रारदेखील या प्रवाशाने केली. मात्र या प्रकरणी काय कारवाई झाली? याबाबत सदर प्रवासी अनभिज्ञ आहे. तर जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराने हात वर करत जबाबदारी झिडकारली आहे.गौरव ठक्कर असे या प्रकरणातील तक्रारदार प्रवाशाचे नाव आहे. जे काही कामानिमित्त शुक्रवारी म्हणजे २७ एप्रिल रोजी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला निघाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी डाळभात आॅर्डर केली. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, मी जेवायला घेतले तेव्हा डाळीत मला मेलेली माशी दिसली. मी हे सोबतच्या प्रवाशांनाही दाखविले. त्यानंतर लगेच रेल्वेमंत्र्यांना टिष्ट्वटद्वारे याची माहिती दिली.‘मी राजधानी गाडीत आहे आणि माझ्या जेवणात मेलेली माशी सापडली आहे...’ अशा आशयाचे टिष्ट्वट त्यांनी केले. यावर समोरून काही वेळातच त्यांना उत्तर आले आणि त्यात ‘आम्ही या प्रकरणी चौकशी करू...’ असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच एक व्यक्ती ठक्कर यांच्याकडे आली आणि तिने याबाबत चौकशी केली. तसेच घडल्या प्रकाराबाबत माफी मागितली. ‘हमारी गलती नही है, वो सब मुंबईसे पॅक होकर आता है,’ असे सांगत त्याने ठक्कर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, संबंधिताकडून चूक लपविण्यात येत असल्याने तसेच काहीच ठोस कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर इतर प्रवाशांच्या सल्ल्यानुसार ठक्कर यांनी या प्रकरणी आयआरसीटीसीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची प्रत आपल्याकडे असल्याचे त्यांनी याप्रकरणी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मी लेखी तक्रार दिली तेव्हा संबंधित व्यक्तीने ती लिहून घेतली. तसेच त्यात ‘हा, मेने मख्खी देखी थी,’ असा रिमार्क टाकला. पण या सर्व प्रकारामुळे मला मनस्ताप झाला. माझी तक्रार लिहून घेत ‘हम उसे आगे भेज देंगे’ असे उत्तर मला देण्यात आले. मात्र त्याचे काय झाले? संबंधितांवर कारवाई करण्यात आली का? याबाबत मला अद्याप काहीच माहिती देण्यात आलेली नाही.- गौरव ठक्कर
रेल्वेमंत्री साहेब, माझ्या जेवणात माशी सापडली!
By admin | Published: May 02, 2017 5:14 AM