मुंबई : सायबर पोलिस, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. अधिकाऱ्याला नरेश गोयल यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले आहे.
मध्य रेल्वेत अधिकारी असलेले शिव महोलिया यांना गेल्या सोमवारी महोलिया यांना दोन तासांत मोबाईल क्रमांक ब्लॉक होणार असल्याचा संदेश आला. त्यांनी संपर्क साधताच व्हिडीओ कॉल सुरू झाला. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभाग पुढे आल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली.
भामट्यांचे न्यायालय
महोलियांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात ऑनलाइन हजर केल्याचे भासवून भामट्यांनी चौकशीचा बनाव रचला. त्यांच्या बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याचे सांगून बँक खात्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्याला द्या, या आदेशानंतर त्यांनी बँक खात्याची माहिती दिली.
संशय बळावला म्हणून...
सायबर भामट्याने महोलिया यांना त्यांच्या एका खात्यातून नऊ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करताना त्यांना संशय आला. त्यांनी बँकेला कॉल करून व्यवहार थांबवण्यास सांगितले; मात्र तोपर्यंत पैसे ट्रान्सफर झाले होते.