रेल्वे प्रवासी असुरक्षितच; तीन दिवसांत ३० प्रवाशांचा मृत्यू तर २८ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:15 AM2018-07-30T05:15:53+5:302018-07-30T05:15:57+5:30
प्रवासी सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचे रेल्वे प्रशासन वारंवार सांगते. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५८ प्रवाशांना फटका बसल्यामुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई : प्रवासी सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचे रेल्वे प्रशासन वारंवार सांगते. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५८ प्रवाशांना फटका बसल्यामुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, हार्बर मार्गावर पनवेल आणि पश्चिम मार्गावर चर्चगेट ते वसई रोड, पालघरपर्यंत उपनगरीय लोकलचा विस्तार आहे. उपनगरीय सेवेतून रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या चुकांमुळे तर कधी प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे प्रवासी मृत्युमुखी पडतात. यात धावती लोकल पकडणे, गर्दीमुळे दरवाजावर उभे असताना हात सटकणे, स्टंट करणे, रेल्वे रुळ ओलांडणे या आणि अन्य कारणांचा समावेश आहे.
जुलै महिन्याचा शेवटचा शुक्रवार उपनगरीय प्रवाशांसाठी घातवार ठरला. शुक्रवारी विविध कारणांमुळे मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर १४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ प्रवासी जखमी झाले. या दिवशी ठाणे स्थानकात सर्वाधिक प्रवाशांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, यात तीन प्रवाशांचे निधन आणि एक प्रवासी जखमी झाला आहे.
‘प्रवासी सुरक्षितता हीच रेल्वेची प्राथमिकता’ असल्याचे रेल्वे प्रशासन नेहमी सांगते. मात्र, रेल्वे प्रशासनाचा दावा किमान जुलै महिन्यात तरी फोल ठरल्याचे दिसून येत आहे. रेल्वे पोलिसांच्या दैनंदिन अपघाती मृत्यू नोंदीनुसार १ जुलै ते २८ जुलै या कालावधीत सुमारे २०० प्रवाशांचे अपघातांमध्ये निधन झाले असून, सुमारे २२४ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वाधिक जास्त अपघाती मृत्यू २७ जुलैला नोंदवण्यात आले आहेत.
गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या तीन दिवसांत एकूण ५८ प्रवाशांना रेल्वेच्या गलथानपणाचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अवघ्या तीन दिवसांत ३० प्रवाशांचा मृत्यू आणि २८ प्रवासी जखमी झाले आहेत. विविध संघटना रेल्वे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने देतात. प्रसंगी आंदोलन करतात. मात्र, रेल्वे प्रशासन याची दखल घेत नाही.
२८ दिवसांत २00 बळी
‘प्रवासी सुरक्षितता हीच रेल्वेची प्राथमिकता’ असल्याचे रेल्वे प्रशासन नेहमी सांगते. मात्र, रेल्वे प्रशासनाचा दावा किमान जुलै महिन्यात तरी फोल ठरल्याचे दिसून येत आहे. रेल्वे पोलिसांच्या दैनंदिन अपघाती मृत्यू नोंदीनुसार १ जुलै ते २८ जुलै या कालावधीत सुमारे २०० प्रवाशांचे अपघातांमध्ये निधन झाले असून, सुमारे २२४ प्रवासी जखमी झाले आहेत.