मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे गाड्यांना तुफान गर्दी होत असतानाच दुसरीकडे आरक्षण असलेल्या स्थानकाऐवजी नंतरच्या स्थानकांवरून गाडी पकडणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तिकीट रद्द होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात विविध ठिकाणांवरील कार्यालयात उशिरापर्यंत काम करून सोयीच्या ठिकाणांवर गाडी पकडणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून, रेल्वे प्रशासनाने मात्र याबाबत नियमांवर बोट ठेवले आहे.
रेल्वे प्रशासनाने सहा ते आठ महिन्यांपूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार, ज्या रेल्वे स्थानकावरून तिकीट आरक्षण काढले जाते, त्याच रेल्वे स्थानकावरून प्रवाशाने प्रवास करणे गरजेचे आहे. संबंधित प्रवाशाने त्या पुढील किंवा नंतरच्या स्थानकावरून प्रवास सुरू केला आणि दरम्यानच्या काळात तिकीट तपासनिसाला संबंधित प्रवासी सीट अथवा बर्थवर न आढळल्यास त्याचे तिकीट रद्द होते. संबंधित सीट बर्थ दुसऱ्या प्रवाशाला दिला जातो.
रेल्वे प्रवाशांनी मात्र यावर आक्षेप नोंदविला आहे. घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबई सेंट्रलवरून गाडी पकडणे शक्य नसते. अशावेळी हे प्रवासी दादर किंवा ठाणे, कल्याणहून गाडी पकडतात. त्यामुळे मधल्या काळात तिकीट रद्द झाल्यास त्या प्रवाशाने काय करावे, या प्रश्नाचे उत्तर मात्र रेल्वेकडे नाही.
रेल्वे प्रशासन काय म्हणते ?
१) सहा ते आठ महिन्यांपूर्वीही हा नियम होता. मात्र, त्यावेळी त्याची कठोर अंमलबजावणी होत नव्हती. आता ती अंमलबजावणी केली जात आहे.
२) एखाद्या प्रवाशाला सीएसएमटीऐवजी दादरवरून प्रवास करायचा असेल तर त्याला २४ तास अगोदर तिकिटात तसे बदल करण्याची मुभा असते. संबंधित प्रवाशाने प्रवासाचे नियोजन करतानाच बोर्डिंग स्थानकही निश्चित करावे, जेणेकरून आरक्षित तिकीट रद्द होणार नाही.
रेल्वेकडे ठोस उत्तर नाही -
सहा ते आठ महिन्यांपूर्वी यासंदर्भातील परिपत्रक का काढावे लागले? याचे उत्तर मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे नाही. परिपत्रकान्वये प्राप्त झालेले आदेश आम्ही पाळतो; यापलीकडे रेल्वेला उत्तर देता आले नाही.