लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. ब्लॉक कालावधीत मुलुंड येथून सकाळी १०:४३ ते दुपारी ३:५३ पर्यंत सुटणाऱ्या धिम्या/सेमी जलद गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविल्या जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर प्रवाशांना सेवा उपलब्ध राहणार नाही आहेत.
कुर्ला आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यानच्या सेवा सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल - वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालविल्या जातील, तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांच्या दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.
सांताक्रुझ ते माहीम धिम्या मार्गावर ब्लाॅक
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते माहीम स्थानकाच्या दरम्यान शनिवारी रात्री १ ते रविवारी पहाटे ४:३० कालावधीत डाऊन धिम्या मार्गावर तर १२:३० ते ४:३० या कालावधीत अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन धिम्या मार्गावरील ब्लॉक कालावधीत लोअर परळ, माहीम आणि खार रोड या स्थानकांवर, तर अप स्लो मार्गावरील ब्लॉक कालावधीत महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे.
गोरेगाव स्टेशनमधील पादचारी पूल ६ महिने बंद राहणार, कारण काय?
नेरळमध्ये रेल्वेचा विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यासाठी रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० असा सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे बदलापूर आणि कर्जत स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी २.३० पर्यंत उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाही. ब्लॉकमुळे ५ मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.