मुंबई : प्रवाशांना रेल्वे स्थानकातील इत्थंभूत माहिती मिळावी, यासाठी पश्चिम रेल्वेने ‘दिशा’ या मोबाइल अॅपचा आधार घेतला आहे. या ‘दिशा’अॅपचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून, या अॅपवर प्रत्येक स्थानकातील सोईसुविधांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होणार नाही. हे अॅप गुगल प्ले स्टोअरद्वारे प्रवाशांना डाउनलोड करता येईल, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. अनेक प्रवाशांना लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करताना एखादे स्थानक कोणत्या स्थानकानंतर येते, तसेच तिकीट सुविधा कुठेआहे इत्यादी माहिती मिळत नाही. यातून प्रवाशांची सुटका व्हावी आणि त्यांना स्थानकातील सोईसुविधांची सर्व माहिती मिळावी, यासाठी अँड्रोइड मोबाइलवरच अॅपद्वारे माहिती देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार, काही महिन्यांपासून ‘दिशा’अॅपवर काम सुरू होते. या अॅपमध्ये स्थानकातील स्टेशन मास्तरचे कार्यालय त्याचप्रमाणे, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस, टीसी यांच्या कार्यालयाची माहिती असेल. त्याशिवाय पादचारी पुल, सब-वे, सरकते जिने, फूड प्लाझा, वॉटर कूलर,वेटिंग रुम,व्हिआयपी रुम, डिलक्स व पे अँड युज टॉयलेट, वाहन पार्किंग, एटीएम, प्रीपेड टॅक्सी, स्थानकाबाहेरीलच असणारे बस स्थानक अशी सर्व माहिती अॅपवर असणार आहे. (प्रतिनिधी)
आता रेल्वे प्रवाशांना मिळणार ‘दिशा’
By admin | Published: February 06, 2017 3:37 AM