Join us  

पेपरलेस मोबाइल तिकीट बनली रेल्वेला डोकेदुखी

By admin | Published: November 12, 2015 12:35 AM

पश्चिम रेल्वे मार्गावर नुकतीच पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली. या सेवेबरोबरच ९ आॅक्टोबरपासून मध्य रेल्वेवरही या सेवेचा शुभारंभ करण्यात आला

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर नुकतीच पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली. या सेवेबरोबरच ९ आॅक्टोबरपासून मध्य रेल्वेवरही या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र ही सेवा पश्चिम आणि मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी बनली असून प्रवाशांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या सेवेला प्रतिसाद मिळण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेच्या क्रिस संस्थेमार्फत ९ आॅक्टोबरपासून मध्य रेल्वे मार्गावर पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू होताच प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद देण्यात आला. पेपरलेस तिकीट काढण्यासाठी लागणारे यूटीएस अ‍ॅप १ लाख ६0 हजार प्रवाशांनी डाऊनलोड केले. महत्त्वाची बाब म्हणजे ९ आॅक्टोबर रोजी ५१९ तिकिटांची विक्री करण्यात आली. तर १0 आॅक्टोबर रोजी ४0५ आणि ११ आॅक्टोबर रोजी २७२ तिकिटांची विक्री झाली. सुरुवातीला मिळालेल्या प्रतिसादानंतर आणखी प्रतिसाद वाढत जाईल, अशी अपेक्षा मध्य रेल्वे प्रशासनाला होती. परंतु त्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. तर पश्चिम रेल्वेवरही हीच परिस्थिती असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. या दोन्ही मार्गांवर अजूनपर्यंत दिवसाला ४00 ते ५00 तिकिटांची विक्री पेपरलेस मोबाइल तिकिटांमार्फत होत आहे. पश्चिम रेल्वे मार्गांवर तर जुलै महिन्यात सेवा सुरू झाली आहे. तरीही प्रवासी या सेवेचा लाभ घेताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)