चोरलेल्या फोनमुळे बबली-बंटी जाळ्यात, रेल्वे पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:06 AM2018-12-03T03:06:07+5:302018-12-03T03:06:15+5:30
लोकलमधून महिलांच्या पर्समधून महागड्या दागिन्यांसह पैसे, मोबाइलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : लोकलमधून महिलांच्या पर्समधून महागड्या दागिन्यांसह पैसे, मोबाइलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शबनम सलीम शेख उर्फ हुसेन शेख (३६), प्रशांत परशुराम जाधव (३९) अशी अटक जोडप्याची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत आतापर्यंत १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात हे जोडपे राहते. कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरची रहिवासी असलेली प्रियांका तगडे ही २३ नोव्हेंबर रोजी कुर्ला रेल्वे स्थानकातून लोकलमध्ये चढत असताना, त्यांच्या पर्समधून ५५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरी झाला. त्यांनी थेट कुर्ला रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर त्यांनी तगडेच्या मोबाइल फोनमध्ये टाकलेल्या सिम कार्डच्या लोकेशनवरून दोघांचा माग काढण्यास सुरुवात केली. ते कोपरखैरणे येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानुसार, कोपरखैरणेमधून या दोघांना पोलिसांनी अटक केली.