Mumbai Local : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही काही टवाळखोर याकडे दुर्लक्ष करुन स्टंटबाजी करत असतात. याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. या स्टंटबाजीमध्ये अनेकांचा जीव देखील गेला आहे. मात्र काहीजण या अपघातातून जीवंत वाचतात पण त्यांना आयुष्याचा धडा मिळतो. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकलमधल्या स्टंटबाजीनंतर तरुणाची अवस्था काय झाली हे वास्तव पोलिसांनी समोर आणलं आहे.
मुंबईतील शिवडी स्टेशनवर धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढून एक मुलगा धोकादायक 'स्टंट' करताना दिसला होता. त्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. रेल्वे पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी अखेर त्या तरुणाला शोधून काढलं आहे. या तरुणाचा नवा व्हिडीओ मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, पोलिसांना व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला मुलगा सापडला आणि अशाच एका स्टंटदरम्यान त्या मुलाचा एक हात आणि एक पाय गमावल्याचे समोर आले.
दोन्ही व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचे नाव फरहत आझा शेख असं असून अँटॉप हिल, वडाळा येथे राहतो. स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने फरहतला शोधून काढलं. त्याच्या घरी रेल्वे पोलीस गेले असता त्याने एक हात आणि पाय गमावल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी याचा व्हिडीओ शूट करुन तो एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये फरहत हा एका खोलीमध्ये गादीवर पाय पसरुन बसला आहे. त्याचा डावा हात आणि पाय त्याने अशाच एका स्टंटमध्ये गमावल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं. "मी अँटॉप हिल येथे राहतो. माझा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मी तो स्टंटबाजीसाठी केला होता. पण एप्रिल महिन्यामध्ये असाच एक स्टंट करताना मी माझा एक हात आणि पाय गमावला," असं फरहतने व्हिडीओत सांगितले.
मध्य रेल्वेची विनंती
"मध्य रेल्वेने व्हायरल व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्याची ओळख पटवली असून त्याने दुसऱ्या एका स्टंटमध्ये एक पाय आणि हात गमावला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगाने कारवाई करत त्या मुलाचे प्रमाण वाचवले. आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करतो की असे जीव धोक्यात घालणारे स्टंट करु नका. तुम्हाला असं कोणी करताना दिलसं तर त्यासंदर्भात ९००४४१०७३५ / १३९ इथे कळवा. सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे," असे मध्य रेल्वेने म्हटलं आहे.