रेल्वे पोलिसालाच काठीने मारहाण

By admin | Published: May 26, 2015 12:51 AM2015-05-26T00:51:31+5:302015-05-26T00:51:31+5:30

दोन केनियन नागरिक आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एका रेल्वे पोलिसालाच (जीआरपी) केनियन नागरिकाकडून काठीने मारहाण केल्याची घटना घडली.

Railway police beat sticks | रेल्वे पोलिसालाच काठीने मारहाण

रेल्वे पोलिसालाच काठीने मारहाण

Next

मुंबई : मोबाइल हरविल्याच्या कारणावरून दोन केनियन नागरिक आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एका रेल्वे पोलिसालाच (जीआरपी) केनियन नागरिकाकडून काठीने मारहाण केल्याची घटना घडली. यात दोन केनियन नागरिकांविरोधात सीएसटी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास दोन केनियन नागरिक हे भायखळा स्थानकाबाहेरच असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू पिऊन आणि जेवण करून स्थानकात आले. भायखळा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन-तीनवर हे दोघेही रात्री साडेबारा वाजेपर्यंत बसून होते. यातील एकाला आपल्याजवळील मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाइल हरविल्याचे लक्षात आले. त्याने याबाबत भायखळा स्थानकातील कॅन्टीन कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित उत्तर न दिल्याने त्या केनियन नागरिकाने एका कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या थोबाडीत मारली. त्यामुळे कॅन्टीनमधील सहा ते सात कर्मचाऱ्यांनी चिडून दोन्ही केनियन नागरिकांना हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. स्थानकात मारहाण होत असल्याचे लक्षात येताच भांडण सोडविण्यासाठी जीआरपीचा एक हवालदार त्या ठिकाणी गेला. मात्र हे भांडण सोडवीत असतानाच एका केनियन नागरिकाने हवालदाराकडे असलेली काठी हिसकावून घेतली आणि त्याच काठीने हवालदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर अन्य पोलिसांच्या सहकार्याने या दोन्ही केनियन नागरिकांना पकडण्यात आले. सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्यात या केनियन नागरिकांच्या तक्रारीवरून कॅन्टीन कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सीएसटी रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर पोलीस हवालदाराच्या कर्तव्यात अडथळा आणल्याबद्दल या दोन्ही केनियन नागरिकांविरोधातही कलम ३५३ आणि ३३२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू
केनियन नागरिक स्टुडंड व्हिसावर भारतात आले होते आणि ते दिल्ली येथे शिक्षण घेत आहेत. केनियन नागरिक आणि पोलीस हवालदारावर जे.जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: Railway police beat sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.