डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई
मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १३९ रेल्वे स्थानके असून, त्यामध्ये ५०५ प्लॅटफॉर्म आहेत. मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या मालमत्तेचे व जीवितांचे संरक्षण करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची असते. या हद्दीतील गुन्ह्यांची दखल रेल्वे पोलिस (जीआरपी) घेते. गुन्ह्यांचा तपास करणे, उघडकीस आणणे, अटक आरोपीविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध करणे, दोषारोपाची योग्य मांडणी करून न्यायालयात सादर करणे आदी कर्तव्ये तपास अधिकारी करीत असतात.
आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालय आरोपीस शिक्षा सुनावते. तेव्हा त्या गुन्ह्यात दोषसिद्धी (कन्व्हिक्शन) झाली, असे म्हणता येते. गुन्ह्याची दोषसिद्धी हा अत्यंत महत्त्वाचा अंतिम टप्पा आहे. यावर्षी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांपैकी सुनावणी पूर्ण झालेल्या खटल्यातील दोषसिद्धी प्रमाण ९९.५३ टक्के असून, आरोपीस तुरुंगात ठेवण्यात यश मिळालेले आहे.
मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयामध्ये गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तपासामध्ये करण्यात येतो. यावर्षी निकाल लागलेल्या गुन्ह्यांचे दोषसिद्धीचे प्रमाण ९३ टक्के आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आरोपीविरुद्ध न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुराव्याची शृंखला तयार करण्यात येते. संबंधितांचे जवाब तत्काळ पोलिसांमार्फत नोंदविले जातात. तसेच त्याचे सीसीटीव्ही फुटेज घेण्यात येते. त्याचप्रमाणे मोबाइल लोकेशनवरून गुन्ह्याच्या वेळी आरोपी, फिर्यादी व साक्षीदार हे घटनास्थळी होते, हे सिद्ध करण्यास मदत होते. त्यामुळे फिर्यादी किंवा साक्षीदार हे फितूर होण्याची शक्यता नसते. मोबाइल चोरीच्या गुन्ह्यामध्ये तंत्रज्ञान व भा.पु.का २७ यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी सबळ पुरावा प्राप्त होतो.
आरोपीस प्रवाशांनी रंगेहाथ पकडल्यास त्याला पोलिस ठाण्यात आणेपर्यंत त्या मार्गातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तत्काळ ताब्यात घेतले जातात. पूर्वी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांविरुद्ध तडीपारी वगैरे कारवाई करावी लागते. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसतो. परिणामी, गुन्हे घडण्याचे प्रमाण घटले आहे.
कोरोनापूर्व दरवर्षी सुमारे ३२,००० हून अधिक गुन्हे मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयात दाखल होत होते. त्यामध्ये विक्रमी घट झालेली आहे. यात पोलिसांची सतर्कता व दोषसिद्धीमुळे गुन्हेगारांवर आलेले नियंत्रण याचा मोठा वाटा आहे. अलीकडच्या काळात घडलेले गुन्हे सुनावणीसाठी तातडीने घेण्याची विनंती न्यायालयास केल्यामुळे फिर्यादी, साक्षीदार न्यायालयात हजर राहून उत्तम प्रकारे साक्ष देतात. त्यामुळे दोषारोप पत्राचे ट्रायल बारकाईने लक्ष ठेवून दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यात मदत होते. पोलिस दलाचा चेहरामोहरा पूर्वीपेक्षा बदलला आहे. मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तरुण-तरुणी आता पोलिस दलात आहेत. जुन्यांचा अनुभव आणि नव्यांची उर्मी यांचा सुरेख मिलाप घडून आला तर पोलिस दल खऱ्या अर्थाने कात टाकू शकेल. समाजाची अपेक्षा पूर्ण करू शकेल.