Join us

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 4:35 AM

Rail Police News : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी दोन वर्षांत  ३,७८० प्रवाशांचा जीव गेला आहे.  अनोळखी मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेताना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

मुंबई : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी दोन वर्षांत  ३,७८० प्रवाशांचा जीव गेला आहे.  अनोळखी मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेताना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. नातेवाईक न मिळाल्याने दोन वर्षांत ९७५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.रेल्वे रुळावरील मृतदेह आणण्यासाठी सर्वात आधी वाहनाची अडचण येते, थेट घटनास्थळापर्यंत वाहन जाऊ शकत नाही. गेलेच तर किमान २०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत वाहन पोहचते. रेल्वे अपघातातील मृतदेहांची अवस्था पाहता रेल्वे पोलिसांना मांसाचे तुकडे गोळा करावे लागतात, हे काम करीत असताना पोलीस नाकीनव येतात, मात्र कर्तव्य महत्त्वाचे असल्याने त्याला प्राधान्य द्यावेच लागते.  खिशात आधारकार्ड किंवा काही पुरावा असला तर ओळख पटवायला सोपं जात असली तरी नातेवाइकांशी संपर्क व्हायला खूप अडचणी येतात. रेल्वे अपघातातील मृत शक्यतो दुसरा जिल्हा किंवा राज्यातीलच असतात, त्यामुळे नातेवाइकांना यायला सहज दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही मृतदेहांचा चेंदामेंदा झालेला असल्याने त्यांची ओळख पटतच नाही. अंगावरील कपडे, शरीरावरील निशाणी व इतर काही खूण असेल तर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करावे लागतात, तरीदेखील ओळख पटतेच असे नाही. ९७५  गेल्या दोन वर्षांत रेल्वे मुंबई आणि परिसरातील ९७५ बेवारस मृतदेहांवर रेल्वे पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याण स्थानकावरील बेवारस मृतदेह असून, १२४ जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत, तर सर्वांत कमी वांद्रे रेल्वेस्थानकात असून, दोन वर्षांत २१ बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले आहेत.बऱ्याचदा रेल्वे अपघातात मयताचा चेहऱ्याचा चेंदामेंदा त्यामुळे प्राथमिक ओळख पटविणे शक्य होत नाही. तसेच मृतदेहाजवळ ओळख पटविण्याजोगे काही मिळत नाही. स्थानिक आणि शहर पोलीस ठाणे यांना बेवारस मयताच्या तपासायला पाठविल्या असता त्यांच्याकडून तत्पर प्रतिसाद मिळत नाही.    - रवींद्र सेनगावकर, आयुक्त, लोहमार्ग पोलीस

टॅग्स :रेल्वेपोलिस