Join us

रेल्वे पोलिसांनी शोधले ४०७ मोबाइल फोन

By admin | Published: March 23, 2015 12:36 AM

रेल्वेत मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सररास घडत आहेत. रेल्वेतील गुन्ह्यांत मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांनीही मोबाइल चोरांच्या विरोधातील कारवाई तीव्र केली आहे.

मुंबई : रेल्वेत मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सररास घडत आहेत. रेल्वेतील गुन्ह्यांत मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांनीही मोबाइल चोरांच्या विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. याचाच परिणाम म्हणून २०१५मध्ये झालेल्या मोबाइल चोऱ्यांपैकी एकूण ४०७ मोबाइल शोधून काढण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारला जातो. यामध्ये पाकीटमारी करण्यापेक्षा मोबाइल लंपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. डेबिट कार्ड्स आणि एटीएम कार्ड्सचा वापर वाढल्यामुळे समान्यपणे पाकिटात मोठी रक्कम ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महागड्या मोबाइल फोन्सकडे चोरांची नजर वळली आहे. १० ते २० हजार रुपयांदरम्यानचे स्मार्ट फोन्स सर्वसामान्य प्रवाशांच्याही खिशात असतात. त्यावर डल्ला मारून सहज कमाई करता येते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मोबाइल चोऱ्यांमधील ४०७ मोबाइल पोलिसांनी हुडकून काढले आहेत. बोरीवली, वसई, अंधेरी, दादर, कुर्ला, ठाणे, वाशी पोलीस ठाण्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात मोबाइल चोऱ्यांचा छडा लावण्यात आला आहे. बोरीवलीतून ८५, वसईतून ७२, अंधेरीतून ४३ तर दादरमधून ३५ आणि वाशीतून ४० मोबाइल फोन्सचा शोध लावण्यात आला आहे.