मुंबई - बोरिवली रेल्वे स्थानकातून अहमदाबादला जात असलेल्या महिला प्रवाशाच्या पर्समधून पावणे सहा लाखांचे हिरेजडित दागिने चोरणाऱ्या आरोपीच्या बोरिवली रेल्वेपोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून सुरत येथील सराफाकडे विकलेले सोने देखील पोलिसांनी जप्त करून चोरीचा माल खरेदी करणाऱ्या सराफाला अटक केली आहे.
भाईंदर येथे राहणारे व्यापारी राहुल कैलासचंद्र अगरवाल (३०) हे लहान भावाच्या लग्नकार्यासाठी अहमदाबाद येथे पत्नी व इतर नातेवाईकांसह जाण्यासाठी १८ जून रोजी बोरिवली रेल्वे स्थानकात आले. त्यांनी फलाट क्रमांक ६ वरून प्रवाशांच्या गर्दीतून गुजरात एक्सप्रेस पकडली. ट्रेन रेल्वे स्थानकातून पुढे गेल्यानंतर नेहा यांच्या लक्षात आले की, त्यांच्या शोल्डर पर्समध्ये ठेवलेली ५ लाख ७५ हजार २०० रुपये किंमतीचे हिरेजडित दागिन्यांची पर्स गर्दीचा फायदा घेत चोरल्याची खात्री झाली. त्यानुसार त्यांनी अहमदाबाद येथे उतरल्यानंतर याची तक्रार दाखल केली. हा गुन्हा बोरिवली रेल्वे स्थानकात घडल्याने या गुन्ह्यचा तपास बोरिवली रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र भिसे, मोहिते, बुगडे, देवकर, कुंभार, माने आदींनी सुरू केला. घटनास्थळावरून सीटीटीव्ही फुटेजची पाहणी केलेल्या पोलिसांना ५ जुलै रोजी ते गस्त घालत असताना एक संशयित प्लॅटफॉर्मवर भटकताना दिसून आला. त्या संशयिताला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयिताचा वावर त्या दिवशी प्लॅटफॉर्मवर दिसून आला. अधिक तपासात संशयिताची श्रीकांत प्रविणचंद्र दामाणी (४८) अशी ओळख झाली. मालवणी, आंबोजवाडी येथे राहणाऱ्या दामाणीने पोलिसांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याने त्याच्या घरातून चोरीचे दोन लाखांचे दागिने पोलिसांच्या स्वाधिन केले, तसेच चोरलेल्या दागिन्यांपैकी इतर दागिने त्याने गुजरात, सुरत येथील भागल भागातील सुरजभाई लोढिया (६०) याच्याकडे विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुरत येथे जाऊन लोढियाकडे चौकशी केली असता त्याने चोरीचे दागिने खरेदी केल्याची व ते दागिने वितळवून त्याची लगड तयार केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याची लगड ताब्यात घेऊन चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी त्याला अटक केली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अशा प्रकारे चोरीतील संपूर्ण मालमत्ता परत मिळवून चांगली कामगिरी केली आहे.