Mumbai Local: मुंबईच्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वेच्या विशेष टीमची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 01:48 PM2021-02-10T13:48:13+5:302021-02-10T13:53:16+5:30
Stunt In Mumbai Local : मुंबईच्या लोकलमधून जीवघेणा स्टंट करतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन दरम्यान मुंबईची लाइफलाइन असलेली मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local) बंद करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास १० महिन्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्यानं अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला तर दुसऱ्या बाजूला अनेक चाकरमानी मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाज टोळक्यांच्या कारनाम्यांना कंटाळले आहेत. अशाच टवाळखोरांवर आता रेल्वेकडून कडक कारवाई केली जाणार आहे. (Stunt in Mumbai Local Train)
मुंबईच्या लोकलमधून जीवघेणा स्टंट करतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडिओ ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमाराचा असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनानं स्टंटबाजांविरोधात एक मोहीमच सुरू केली आहे. स्टंटबाज टोळक्यांना हेरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक टीम तैनात केली आहे.
मुंबईकरांना लवकरच दिलासा! मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लोकलबाबत दिली मोठी माहिती
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकलमध्ये स्टंट करणारा तरुण हा अंबरनाथहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधून जात होता. यावेळी एका सतर्क प्रवाशानं या स्टंटबाज तरुणाला स्टंट करताना पाहिलं आणि त्याच्या मोबाइलमध्ये याचं चित्रीकरण केलं. चित्रीकरणावेळी लोकल सायन ते दादर या स्थानकादरम्यान होती.
स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई
व्हायरल झालेला व्हिडिओ अतिशय जीवघेणा आणि धक्कादायक आहे. एका हातानं लोकलच्या दरवाजातील हँडल पकडून ट्रेनमध्ये लटकत स्टंटबाजी करतानाचा हा व्हिडिओ आहे. यात लोकलचा प्रचंड वेग असतानाही दरवाजाच्या बाहेर येऊन येत्याजात्या लोखंडी खांबांना स्पर्श करण्याचा स्टंट हा तरुण करत असल्याचं दिसतं. इतकंच नव्हे, तर त्यानं दुसऱ्या दिशेनं येणाऱ्या लोकलच्या मोटरमनला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसतं. अशा जीवघेण्या स्टंटबाजीमुळे आजवर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. असं असतानाही स्टंटबाजांचा उपद्रव काही थांबताना दिसत नाही. मध्य रेल्वेच्या चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर शिवाजी सुतार यांनी अशा स्टंटबाजांना रोखण्यासाठी आता विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचं सांगितलं. याअंतर्गत स्टंटबाजांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दररोज १० जणांचा होता लोकल प्रवासात मृत्यू
मुंबईतील रेल्वे अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दररोज जवळपास १० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू होत आहे. तर तितकेच जण जखमी देखील होतात. हाच आकडा वर्षाच्या शेवटपर्यंत तब्बल ३ हजारापर्यंत जाऊन पोहोचतो. अशावेळी रेल्वेकडून प्रवाशांमध्ये सुरक्षित रेल्वे प्रवासासाठीची जनजागृती मोहीम देखील हाती घेण्यात येते. यानंतरही लोकलमधल्या स्टंटबाजीवर अद्याप पूर्णपणे आळा घातला आलेला नाही.